भारतीय नौदल दोनशेहून अधिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करणार

नवी दिल्ली – भारतीय नौदलाने २०० ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची खरेदी करण्याची तयारी केली आहे. ही क्षेपणास्त्रे भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांवर तैनात केली जातील. संरक्षण मंत्रालयासमोर प्राथमिक स्वरूपात हा प्रस्ताव आला असून यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या कुरापतखोर कारवाया वाढत असताना, नौदलासाठी केली जात असलेली ही ब्राह्मोसची खरेदी लक्षणीय ठरते. देशांतर्गत पातळीवर शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचा वेग यामुळे अधिकच वाढणार असल्याचे संकेत यामुळे मिळत आहेत.

भारतीय नौदल दोनशेहून अधिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करणारडीआरडीओ आणि रशियाच्या फेडरल स्टेट युनिटरी एंटरप्राईझ या कंपनीने मिळून ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. गेल्या काही वर्षात या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० किलोमीटरवरून ४०० किलोमीटर अंतरापर्यंत वाढविण्यात आली आहे. जगभरातील प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणेलाही गुंगारा देण्याची क्षमता ब्रह्मोस क्षेपणास्त्राकडे आहे. म्हणूनच या क्षेपणास्त्राच्या खरेदीत काही देशांनी स्वारस्य दाखविले होते. चीनसारखा प्रबळ देश देखील ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या एलएसीवर भारताने केलेल्या तैनातीमुळे अस्वस्थ झाला होता. अशा परिस्थितीवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा आपल्या ताफ्यात समावेश करण्यासाठी भारतीय नौदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची मागणी नौदलाने केली आहे. हा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यात आहे असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

ब्रह्मोसच्या नौदल आवृत्तीची मारकक्षमता ३५० ते ४०० किलोमीटर इतकी आहे. लवकरच याचा पल्ला ८०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात येईल, असे सांगितले जाते. त्यामुळे नौदलाच्या मारकक्षमतेत प्रचंड प्रमाणात वाढ होईल. यामुळे भारतीय युद्धनौका व विनाशिका दूरवरून शत्रूवर अचूकतेने व अतिशय प्रभावी मारा करू शकतील. ब्रह्मोसच्या नव्या आवृत्ती विकसित करताना देशात तयार झालेल्या सुट्ट्या भागांचा व इतर यंत्रणांचा वापर वाढविण्यात आला होता. याचा फार मोठा लाभ देशातील संरक्षणाशी निगडीत उद्योगांना मिळत आहे. तसेच भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये पुढच्या काळात ब्रह्मोस महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल. फिलिपाईन्सने भारताकडे ब्रह्मोसची मागणी केली असून फिलिपाईन्सच्या नौदलाच्या तुकड्यांनी सध्या भारतात ब्रह्मोसचे प्रशिक्षण घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. तसेच पुढच्या काळात फिलिपाईन्सच्या नौदलाच्या आणखी काही तुकड्या भारतात येऊन यासंदर्भातील प्रशिक्षण घेणार आहेत. व्हिएतनामने देखील ब्रह्मोसच्या खरेदीमध्ये स्वारस्य दाखविले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयएनएस कोलकाता युद्धनौकेवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. यासाठी अपग्रेडेड मॉड्युलर लाँचरचा वापर करण्यात आला होता.

हिंदी

 

leave a reply