भारतीय नौदलाने चीनचे दुःसाहस रोखले

- व्हाईस ॲडमिरल ए. के. चावला

कोची – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असतानाही, चीनने हिंदी महासागर क्षेत्रात कुठलेही दुःसाहस करू शकला नाही, यामागे भारतीय नौदलाची फार मोठी भूमिका आहे, असे व्हाईस ॲडमिरल ए. के. चावला यांनी म्हटले आहे. कोची येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्हाईस ॲडमिरल चावला यांनी कुठल्याही दुःसाहसाचा सामना करण्यासाठी नौदल तयार होते व आहे, असे सांगून चीनला सज्जड इशारा दिला. भारतीय नौदल आपली क्षमता व सामर्थ्य वाढवित असून 2022 सालापर्यंत दुसरी विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ नौदलात सहभागी होईल, असा विश्‍वास व्हाईस ॲडमिरल चावला यांनी व्यक्त केला आहे.

दुःसाहस

‘सागरी क्षेत्रात किंवा सीमेवरही आमच्या वैर पत्करू नका, हा संदेश भारताकडून चीनला सुस्पष्टपणे देण्यात आला होता’, असे व्हाईस ॲडमिरल ए. के. चावला म्हणाले. भारतीय नौदल सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे कुणीही सागरी क्षेत्रात भारताच्या विरोधात आगळीक करण्याची शक्यता नाही, असे आपल्याला वाटत असल्याचे व्हाईस ॲडमिरल चावला म्हणाले. नौदल सदैव सज्ज आहे आणि सतत आपली क्षमता वाढवित असल्याचे व्हाईस ॲडमिरल चावला यांनी स्पष्ट केले.

आपल्या क्षमता अधिकाधिक प्रमाणात वाढविण्यावर नौदल विशेष भर देत असल्याचा दावाही यावेळी व्हाईस ॲडमिरल चावला यांनी केला. दरम्यान, लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झालेला असताना, हिंदी महासागर क्षेत्रात भारताला आव्हान देण्याचा अयशस्वी प्रयत्न चीनने करून पाहिल्याचे दावे केले जातात. मात्र भारतीय नौदलाने मलाक्काच्या आखातात केलेली तैनाती चीनला धडकी भरविणारी ठरली. या क्षेत्रातून चीनची मालवाहतूक होते. भारतीय नौदलाचे मलाक्काच्या आखातावर वर्चस्व असून कुठल्याही क्षणी भारत आपली ही मालवाहतूक बंद पाडू शकतो, याची जाणीव चीनला आहे.

भारत आणि चीनमधील सीमावाद तीव्र बनलेला असतानाच, मलाबार युद्धसराव आयोजित करून भारताने आपल्या सामर्थ्याची चुणूक चीनला दाखविली होती. या युद्धसरावात भारताबरोबर अमेरिका व जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश सहभागी झाले होते. दोन टप्प्यात झालेल्या या युद्धसरावामुळे चीन अधिकच असुरक्षित बनल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे होते. त्याखेरीज भारतीय नौदलाने युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र तसेच पाणबुडीभेदी टॉर्पिडोंच्या चाचण्या करून चीनला इशारे दिले होते. या चाचण्यांच्या धडाक्यातून चीनला संदेश मिळाल्याचा दावा केला जातो.

हिंदी महासागर क्षेत्रातील भारतीय नौदलाचे वर्चस्व चीनला खुपत आहे. म्हणूनच चीन लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर भारताला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आला आहे. चीनचा खरा हेतू भारताच्या नौदलाचे वर्चस्व कमी करणे हेच आहे, असे भारतीय सामरिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मात्र भारतीय नौदलाचा प्रभाव कमी करण्यात चीनला यश मिळालेले नाही. उलट अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाशी सहकार्य वाढवून भारतीय नौदल चीनला काटशह देत आहे.

leave a reply