या वित्तीय वर्षात भारताच्या सेवाक्षेत्राची निर्यात 300 अब्ज डॉलर्सवर जाईल

व्यापारमंत्री पियूष गोयल

गांधीनगर – या वित्तीय वर्षात भारताच्या सेवा क्षेत्रातून होणारी निर्यात तब्बल 300 अब्ज डॉलर्सवर जाईल, असा विश्वास व्यापार व उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला. जागतिक स्तरावर आर्थिक उलथापालथी सुरू असताना देखील भारताच्या सेवा क्षेत्राने केलेली ही कामगिरी लक्षणीय ठरते, याकडे व्यापारमंत्र्यांनी लक्ष वेधले. तर या 2022-23च्या वित्तीय वर्षातील व्यापारी निर्यातीत देखील वाढ अपेक्षित असल्याचे सांगून ही समाधानकारक कामगिरी ठरते, असा दावा पियूष गोयल यांनी केला आहे.

India's services sector2022-23च्या वित्तीय वर्षातील सेवा क्षेत्रातील आत्तापर्यंतची कामगिरी पाहता या वित्तीय वर्षात भारताचे सेवा क्षेत्र सुमारे 300 अब्ज डॉलर्सची वेस पार करील, असे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले. गुजरातच्या गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना व्यापारमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त केला. केंद्र सरकारने हाती घेतलेला रचनात्मक सुधारणांचा कार्यक्रम, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. यामुळे सेवाक्षेत्राची प्रगती होत असून सध्याचा कल कायम राहिला तर या वित्तीय वर्षाच्या अखेरीस देशाच्या सेवाक्षेत्रातून होणारी निर्यात 332.76 अब्ज डॉलर्सवर जाईल, असे गोयल म्हणाले.

त्याचवेळी भारताच्या आयातीतही वाढ होत आहे असे सांगून यात 24.96 टक्क्यांची वाढ झाली असून ही आयात 551.7 अब्ज डॉलर्सवर गेल्याची बाब गोयल यांनी लक्षात आणून दिली. या वित्तीय वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यातील निर्यात व आयातीतील तूट 218.94 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. गेल्या वित्तीय वर्षात ही तूट 136.45 अब्ज डॉलर्स इतकी होती. पण गेल्या वर्षी देशाची व्यापारी निर्यात 422 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती, याचीही आठवण पियूष गोयल यांनी करून दिली. 

एकाच वेळी देशाची निर्यात व आयात वाढत असताना अजूनही यामधील तफावत कमी करण्यात देशाला यश मिळालेले नाही, हे व्यापारमंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीवरून उघड होत आहे. डिसेंबर महिन्यात भारताच्या निर्यातीत 12.2 टक्क्यांची घट झाली होती. याला जागतिक पातळीवरील उलथापालथी जबाबदार असल्याचे सांगितले जाते. यामुळे निर्यात व आयातीमधील तूट 23.76 टक्क्यांनी वाढल्याचे व्यापारमंत्री म्हणाले. अशारितीने वेगवेगळ्या महिन्यात निर्यातीच्या बाबतीत चढउतार पहायला मिळाले. पण एकंदरीत विचार करता भारतातून होणारी निर्यात, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चिततेच्या काळातही चांगली कामगिरी करीत असल्याचा दावा व्यापारमंत्र्यांनी केला आहे.

पुढच्या काळात निर्यात अधिक प्रमाणात वाढविण्याची आवश्यकता आहे आणि केंद्र सरकार यासाठी प्रयत्नशील असल्याचे पियूष गोयल यांनी स्पष्ट केले. अमेरिका, युरोपिय देश आणि चीनच्या अर्थव्यवस्थेत थोडीफार सुधारणा झाली, तरी त्याचा लाभ भारताला मिळेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी अधिकच सुधारेल, असा दावा यावेळी गोयल यांनी केला. याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी जागतिक परिस्थितीशी व इतर देशांच्या अर्थव्यवस्थांवर अवलंबून असल्याची जाणीव व्यापारमंत्र्यांनी करून दिली. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका संभवत असल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फार मोठा फटका बसणार नाही, असा दावा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालात करण्यात आला आहे. असे असले तरी इतर देशांच्या आर्थिक परिस्थितीवर भारताची निर्यात अवलंबून असेल, ही बाब लक्षात आणून देऊन भारतीय अर्थतज्ज्ञ जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथींचे परिणाम काही प्रमाणात भारतालाही सहन करावे लागतील, याची जाणीव करून देत आहेत.

leave a reply