बँकिंग क्षेत्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर प्रति औंस दोन हजार डॉलर्सवर जाण्याचे संकेत

लंडन/वॉशिंग्टन – अमेरिका व युरोपातील बँकिंग क्षेत्रात आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांनी आपले लक्ष सोन्याकडे वळविल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी अमेरिकी बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी उसळी घेत प्रति औंस (२८.३३ ग्रॅम) १,९८८ डॉलर्सचा उच्चांक गाठला. ही गेल्या ११ महिन्यांमधील सर्वाधिक पातळी ठरली असून लवकरच सोन्याचे दर दोन हजार डॉलर्सचा स्तर ओलांडतील, असा दावा विश्लेषक व वित्तसंस्थांनी केला आहे.

बँकिंग क्षेत्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर प्रति औंस दोन हजार डॉलर्सवर जाण्याचे संकेतअमेरिकेत अवघ्या आठवड्याभरात तीन बँका बुडाल्या असून बँकिंग क्षेत्राच्या समभागांमध्ये प्रचंड घसरण होत आहे. गुरुवारी अमेरिकेतील ‘फर्स्ट रिपब्लिक बँके’चे समभाग गडगडल्याने सरकारला हस्तक्षेप करणे भाग पडले. अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने देशातील आघाडीच्या बँकांच्या सहाय्याने जवळपास ३० अब्ज डॉलर्सचा निधी उभारून बँकेला वाचविण्याच्या हालचाली सुरू केल्या. या बँकेने ‘फेडरल रिझर्व्ह’कडून १०९ अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य घेतल्याचेही समोर आले आहे. अमेरिकेच्या ‘एफडीआयसी’ने दिलेल्या अंदाजानुसार, नजिकच्या काळात अमेरिकी बँकांना ६२० अब्ज डॉलर्सचा आर्थिक फटका बसू शकतो.

बँकिंग क्षेत्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर प्रति औंस दोन हजार डॉलर्सवर जाण्याचे संकेतदुसऱ्या बाजूला जगातील दहा सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ‘क्रेडिट स्यूस’ या स्विस बँकेसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगण्यात येते. या बँकेचे समभाग आठ टक्क्यांहून अधिक घसरले असून आर्थिक ताळेबंदातील गडबडींसह अनेक गैरव्यवहार समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या बँकेतून जवळपास ५० कोटी डॉलर्सचा निधी काढून घेण्यात आल्याचा दावाही करण्यात येतो. स्विस बँकिंग हे कठोर नियम व सुरक्षितता या कारणांसाठी ओळखले जात असताना याच देशातील आघाडीच्या बँकेतील गडबडी उघड होणे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.

बँकिंग क्षेत्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर प्रति औंस दोन हजार डॉलर्सवर जाण्याचे संकेतअमेरिका व युरोपमधील बँकिंग क्षेत्र हे जगातील प्रगत बँकिंग़ व्यवस्था म्हणून ओळखले जाते. मात्र दोन्ही ठिकाणी एकाच वेळी बँकिंग क्षेत्राला एकापाठोपाठ एक धक्के बसल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचे परिणाम बाजारपेठेतील इतर घटकांवर होताना दिसत आहेत. बँकिंग क्षेत्रातील संकट उघड झाल्यापासून सोन्याच्या दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. अवघ्या आठवड्याभरात सोन्याच्या दरांनी सुमारे सहा टक्क्यांची उसळी घेतली असून प्रति औंसामागे १०६ डॉलर्सहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

हिंदी

 

leave a reply