लडाखच्या एलएसीवरील चर्चेनंतर भारत-चीनच्या लष्कराचे संयुक्त निवेदन

नवी दिल्ली – १६ तासांच्या प्रदिर्घ चर्चेनंतर भारत आणि चीनच्या लष्करी अधिकार्‍यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. लडाखच्या एलएसीवरील पँगाँग सरोवर क्षेत्रातून दोन्ही देशांच्या लष्कराने माघार घेतल्याने इथला वाद सामोपचाराने सोडविणे सोपे बनल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. लडाखच्या एलएसीवरील इतर समस्या सोडविण्यासाठी शांतपणे क्रमबद्ध उपाययोजना करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले. भारत व चीनच्या नेत्यांनी संपर्क, संवाद व स्थैर्य आणि नियंत्रण राखून सीमावाद सोडविण्याच्या दाखविलेल्या मार्गावरूनच पुढे जाण्याचा निर्णय उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमधील या चर्चेत पार पडल्याचे या संयुक्त निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

लडाखच्या एलएसीवरील पँगाँग सरोवर क्षेत्रातून दोन्ही देशांच्या लष्कराने माघार घेतलेली आहे. पण अजूनही लडाखच्या उत्तरेकडील हॉट स्प्रिंग्ज्, गोग्रा आणि डेप्सांग इथे दोन्ही देशांचे लष्कर तैनात आहे. इथून उभय देशांच्या लष्कराने माघार?घेतल्याखेरीज एलएसीवरचा तणाव निवळणे शक्य नसल्याचा निर्वाळा माजी लष्करी अधिकारी देत आहेत. त्यासाठी शनिवारपासून लडाखच्या एलएसीवर भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची चर्चा सुरू झाली होती. सुमारे १६ तास चाललेली ही चर्चा स्पष्ट व उत्तम वातावरणात पार पडल्याचे सांगितले जाते. पँगाँग सरोवर क्षेत्रातील सैन्यमाघारीमुळे पुढच्या वाटाघाटी करणे व सामोपचाराने इथला वाद सोडविणे सोपे गेल्याचे या चर्चेत लष्करी अधिकार्‍यांनी मान्य केले. यासंदर्भात संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. याची रचना अत्यंत सावधानतेने करण्या आल्याचे दिसत आहे.

यानुसार शांतपणे व क्रमबद्धतेने लडाखच्या एलएसीवरील इतर समस्या सोडविण्यावर चर्चा केली जाईल, अशी घोषणा सदर निवेदनात करण्यात आलेली आहे. या संयुक्त निवेदनाचे भारताच्या सामरिक विश्‍लेषक तसेच माजी लष्करी अधिकार्‍यांनी स्वागत केले आहे. पण अजूनही भारताने चीनबाबत सावधानता दाखविण्याची आवश्यकता असल्याचे सामरिक विश्‍लेषक व माजी लष्करी अधिकारी सांगत आहेत. लडाखच्या एलएसीवर लष्कर तैनात ठेवून काहीही हाती लागणार नाही, याची जाणीव झाल्यानेच चीन या क्षेत्रातून माघार घेत असल्याचे माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

चीनच्या लष्कराने माघार घ्यावी, यासाठी भारताने कुठल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही, अशी ग्वाही देशाचे नेते व लष्करी अधिकारी देत आहेत. भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करून चीनच्या हाती बदनामीखेरीज काहीही लागले नाही, असे नुकतेच म्हटले होते. आपल्या या घुसखोरीवर भारताने दिलेली प्रतिक्रिया चीनला चकीत करणारी ठरली. भारत लष्करीदृष्ट्या किती प्रबळ बनला आहे, याची जाणीव या निमित्ताने चीनला झाली आहे. त्याचवेळी भारत काहीही झाले तरी आपल्या विरोधात आर्थिक पातळीवर निर्णय घेऊ शकणार नाही, हा चीनचा भ्रम देखील भारताच्या राजकीय नेतृत्त्वाने खोटा ठरविला. याचा परिणाम झाला व चीनला लडाखच्या एलएसीवरून माघार?घ्यावीच लागली, असे भारताचे मुत्सद्दी सांगत आहेत.

leave a reply