अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियातील दूतावासांसह आघाडीच्या कंपन्यांमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची घुसखोरी

घुसखोरीलंडन/कॅनबेरा/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियाच्या दूतावासांसह बड्या कंपन्या, बँका, विद्यापीठे व अभ्यासगटांमध्ये घुसखोरी केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. चीनमधील लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी सायबरहल्ल्याच्या माध्यमातून ही माहिती मिळविल्याचे सांगण्यात येते. चीनच्या सत्ताधारी राजवटीच्या कारवाया जगासमोर उघड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गटाने ही माहिती प्रसारमाध्यमांद्वारे समोर आणली आहे. या घटनेनंतर ब्रिटनच्या सत्ताधारी पार्टीचे वरिष्ठ नेते इयान डंकन स्मिथ यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असून, कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे.

घुसखोरीचीनच्या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी काही वर्षांपूर्वी कम्युनिस्ट पार्टीशी निगडीत एका सर्व्हरवर सायबरहल्ला चढविला होता. या सायबरहल्ल्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सुमारे 19 लाख 50 हजार सदस्यांची नावे, फोन नंबर व इतर माहिती हाती लागली होती. चीनमधील कार्यकर्त्यांनी ही माहिती ‘इंटर पार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना’ या आंतरराष्ट्रीय गटाकडे सोपविली होती. या गटात अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा व युरोपिय देशांसह 19 देशांमधील 150 संसद सदस्यांचा समावेश आहे. या गटाने आपल्याकडील माहिती तज्ज्ञ तसेच प्रसारमाध्यमांकडे सोपविली होती. त्यानंतर ब्रिटन व ऑस्ट्रेलियातील प्रमुख माध्यमांनी ही माहिती प्रसिद्ध केली. या माध्यमांनी दिलेल्या माहितीत, कम्युनिस्ट पार्टीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेल्या सदस्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबून विविध देशांच्या दूतावासात घुसखोरी करण्यात यश मिळविल्याचे समोर आले आहे. चीनमधील किमान 10 देशांच्या दूतावासांमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य वर्षानुवर्षे काम करीत असल्याचे उघड झाले आहे. दूतावासांव्यतिरिक्त आघाडीच्या शिक्षणसंस्था, अभ्यासगट, बड्या कंपन्या, बँका यातही कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य वर्षानुवर्षे कार्यरत असल्याचे वृत्तात सांगण्यात आले आहे. यात एअरबस, बोर्इंग, जग्वार लँड रोव्हर, रोल्स रॉईस, ॲस्ट्राझेनेका, फायझर, एएनझेड बँक, स्टँडर्ड चार्टर्ड, एचएसबीसी यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

घुसखोरी

ॲस्ट्राझेनेका व फायझरसारख्या आघाडीच्या फार्मा कंपन्यांमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे जवळपास 123 सदस्य विविध पदांवर कार्यरत आहेत. तर स्टँडर्ड चार्टर्ड व एचएसबीसीच्या सुमारे 20 शाखांमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे 600हून अधिक सदस्य काम करीत आहेत. ऑस्ट्रेलियाचे चीनमधील दूतावास व इतर राजनैतिक कार्यालयांमध्ये सुमारे कम्युनिस्ट पार्टीचे सुमारे 250 सदस्य काम करीत असल्याचे समोर आले आहे. ‘एएनझेड’ या बँकेची चीनमध्ये ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ या नावाने शाखा असून त्यातील 23 जण कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य आहेत.

कम्युनिस्ट पार्टीच्या घुसखोरीबाबत उघड झालेल्या माहितीनंतर ब्रिटनच्या सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे वरिष्ठ नेते इयान डंकन स्मिथ यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटीश सरकारने तातडीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दूतावास व संबंधित कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. त्याचवेळी ब्रिटनमधील कंपन्या तसेच शिक्षणसंस्था चीनच्या घुसखोरीकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. चीन ब्रिटनसह इतर पाश्‍चात्य देशांमधील लोकशाहीवादी मूल्ये व जीवनशैली उद्ध्वस्त करीत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियातही या मुद्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये सध्या असलेला तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply