व्याजदरातील वाढीनंतरही अमेरिकेत महागाईचा भडका कायम

- अमेरिकी अर्थमंत्र्यांकडून अधिक कठोर पावले उचलण्याचा इशारा

महागाईचा भडकावॉशिंग्टन – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने गेल्या सात महिन्यात सलग पाचवेळा व्याजदरात वाढ केली आहे. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ही दरवाढ महत्त्वाची असल्याचे फेडरल रिझर्व्हकडून सातत्याने सांगण्यात आले आहे. पण फेडरल रिझर्व्हकडून करण्यात आलेली दरवाढ व दाव्यानंतरही अमेरिकेतील महागाईचा भडका कायम असल्याचे उघड झाले. गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील महागाई निर्देशांक 8.2 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. हवाईप्रवास, वीज, इंधन व घरभाड्यात झालेली प्रचंड वाढ हे महागाईच्या भडक्याचे कारण ठरल्याचे समोर आले आहे.

गेल्याच महिन्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात पाऊण टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अमेरिकेतील व्याजदर 3.25 टक्क्यांवर पोहोचला असून हा 2008 सालानंतरचा उच्चांक ठरतो. पाऊण टक्क्यांची वाढ करण्याची ही सलग तिसरी वेळ असून यापुढील वाढही तितकीच असेल, असे संकेत फेडरल रिझर्व्हकडून देण्यात आले होते. अमेरिकेचे व्याजदर सव्वातीन टक्क्यांवर नेऊन ठेवताना ही बाब महागाई नियंत्रणात आणण्यासाठी निर्णायक घटक असल्याचे दावे फेडरल रिझर्व्हकडून करण्यात आले होते. पण सलग तीनदा पाऊण टक्क्यांची वाढ केल्यानंतरही अमेरिकेतील महागाई निर्देशांक आठच्या खाली आणण्यात अमेरिकी यंत्रणेला यश मिळालेले नाही.

महागाईचा भडकाउलट नव्या आकडेवारीनंतर अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी, महागाईतील वाढ अधिक कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे दाखवून देते, अशा शब्दात पुढील काळात अधिक कडक निर्णय घेण्याचे संकेत दिले. आकडेवारी घोषित करण्यापूर्वी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतही व्याजदरात वाढीचे सत्र कायम ठेवण्यात येईल, असे संकेत देण्यात आले. त्यामुळे अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांमध्ये अस्वस्थता असून शेअर तसेच चलन बाजारपेठेत त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकी डॉलर अधिक भक्कम झाला असून जपानी येन व इतर प्रमुख चलनांमध्ये मोठी घसरण झाली आहे.

महागाईचा भडकाअमेरिकेतील वाढत्या महागाईमागे हवाईप्रवास, इंधन, वीज, अन्नधान्य, नवीन गाड्या व घरभाड्यात झालेली वाढ कारणीभूत ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अमेरिकेतील विमानप्रवास तब्बल 43 टक्क्यांनी महागला आहे. तर इंधनात 18 टक्के व वीजेच्या दरात 15.5 टक्क्यांची भर पडली आहे. अन्नधान्याचे दर 13 टक्क्यांनी वाढले असून घरभाड्यात सात टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या महागाईमुळे अमेरिकी जनतेचे बजेट कोलमडले असून अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषकांकडून बायडेन प्रशासनाला धारेवर धरण्यात येत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटतील, असे राजकीय विश्लेषकांनी बजावले आहे.

महागाई रोखण्यासाठी व्याजदरवाढ कायम ठेवणार असून पुढील वर्षापर्यंत अमेरिकेतील व्याजदर 4.6 टक्क्यांपर्यंत नेण्यात येतील, असे फेडरल रिझर्व्हकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ ठरेल, असे सांगण्यात येते. या वाढीमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा फटका बसेल, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला. अमेरिकेला मंदीचा फटका बसल्यास जागतिक अर्थव्यवस्थाही मंदीत जाण्याची भीती आहे, असे वर्ल्ड बँक तसेच नाणेनिधीने यापूर्वीच बजावले आहे.

leave a reply