पाकिस्तानातील अस्थैर्यामुळे या क्षेत्रात युद्ध भडकेल

- अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी झाल्मे खलिलझाद

वॉशिंग्टन – पाकिस्तानातील अस्थैर्याचा विघातक परिणाम या क्षेत्रावर होऊन इथे युद्ध पेटू शकते, असा इशारा अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिला आहे. अमेरिकेचे अफगाणिस्तानविषयक विशेषदूत म्हणून काम पाहिलेल्या झाल्मे खलिलझाद यांनी पाकिस्तानतील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करून यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. खलिलझाद यांचा हा इशारा प्रसिद्ध होत असतानाच, अमेरिकेच्या सुमारे ६६ लोकप्रतिनिधींनी पाकिस्तानात लोकशाहीसाठी बायडेन प्रशासनाने आपल्या प्रभावाचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. हा योगायोग नसून याद्वारे अमेरिका पाकिस्तानातील अमेरिकासमर्थकांना व विरोधकांनाही संदेश देत असल्याचे दिसते.

पाकिस्तानातील अस्थैर्यामुळे या क्षेत्रात युद्ध भडकेल - अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी झाल्मे खलिलझादपाकिस्तानात सध्या अराजक माजले असून हा देश कुणाच्याही नियंत्रणात नसल्याचे दिसत आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर पाकिस्तानचे तुकडे पडतील आणि ते जोडण्याचे काम अवाक्याबाहेरचे असेल, असे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बजावले आहे. पाकिस्तानचे विश्लेषक व माध्यमे देखील देशाचे तुकडे पडण्याची भीती व्यक्त करीत आहेत. असे असले तरी पाकिस्तानचे सरकार व लष्कर आपल्याला आव्हान देणाऱ्या इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांना कुठल्याही प्रकारची सवलत देण्यास तयार नाही. इम्रान खान यांना ९ मे रोजी झालेल्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी देशभरात हिंसाचाराचे सत्र सुरू केले होते. या काळात इम्रान खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर थेट आरोप केले आणि खुले आव्हानही दिले होते.

याचे पडसाद पाकिस्तानात उमटत असून पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खान यांना त्यांची जागा दाखवून देण्याची जोरदार तयारी केली आहे. यामुळे पाकिस्तानात सरकार आणि लष्कराच्या विरोधात इम्रान खान आणि त्यांचे समर्थक असा संघर्ष पेटलेला आहे. प्रत्यक्षात हा संघर्ष अमेरिका व चीन या देशांमधला असल्याचे काही विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. इम्रान खान पाकिस्तानी लष्करावर डॉलरधार्जिणे असल्याचा आरोप करीत आहेत. तसेच आपल्याला ठार मारण्याचा कट अमेरिकेत शिजल्याचा दावाही इम्रान खान यांनी केला होता. पण प्रत्यक्षात सध्या अमेरिकाच इम्रान खान यांच्या बाजूने उभी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. कारण पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार चीनच्या जवळ चालले असून ही बाब अमेरिकेला मान्य नाही.

म्हणूनच पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली असताना देखील अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज पाकिस्तानला मिळू दिलेले नाही. त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्करप्रमुख चीनचे दौरे करून आर्थिक सहाय्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे सरकार चीनच्या अधिकाधिक जवळ चाललले असताना याला विरोध करणाऱ्या इम्रान खान यांना सहाय्य करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतल्याचे संकेत मिळत आहेत. झाल्मे खलिलझाद यांनी केलेली विधाने इम्रान खान यांच्या बाजूला झुकलेली असल्याचे दिसते. त्याचवेळी पाकिस्तानात लोकशाही भक्कम करण्यासाठी बायडेन प्रशासनाकडे ६६ संसदसदस्यांनी केलेली मागणी देखील इम्रान खान यांची बाजू उचलून धरणारी असल्याचे दिसते.

सध्या पाकिस्तानात फार मोठ्या उलथापालथी सुरू असताना, अमेरिका व चीन या देशांचा हस्तक्षेप पाकिस्तानातील परिस्थिती अधिकच चिघळवणारी ठरते. यामुळे पुढच्या काळात पाकिस्तानची अवस्था घनघोर संघर्ष आणि हिंसाचाराने ग्रासलेल्या एखाद्या आफ्रिकन देशासारखी होईल, अशी भयावह शक्यता वर्तविली जाते. झाल्मे खलिलझाद यांनी देखील पाकिस्तानसारखा मोठा देश अशारितीने कोलमडत असल्याचे सांगून त्यावर चिंता व्यक्त केली आहे. मात्र पाकिस्तानातील काहीजणांनी याआधी खलिलझाद यांनी आपल्या देशाबाबत केलेल्या विधानांवर जोरदार आक्षेप घेतला होता. अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्यमाघारीची तयारी करणारे खलिलझाद म्हणजे सीआयएचे एजंट असून ते पाकिस्तानात वेगवेगळ्या मार्गाने हस्तक्षेप करीत आहेत. त्यांनी पाकिस्तानबद्दल व्यक्त केलेली चिंता बेगडी असल्याचा आरोप या देशातील काही सामरिक विश्लेषकांनी केला होता.

हिंदी

 

leave a reply