पाकिस्तान सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू

लाहोर – पाकिस्तानातील ११ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इम्रान खान यांचे सरकार आणि पाकिस्तानच्या लष्कराविरोधात पुकारलेले आंदोलन शुक्रवारपासून सुरू झाले. सुमारे ५० हजार जणांचा सहभाग असलेल्या या निदर्शनात ‘गो नियाझी गो’च्या जोरदार घोषणा देऊन पंतप्रधान इम्रान यांच्या सरकारचा राजीनामा मागण्यात आला. गुजरानवालापासून सुरू झालेली ही निदर्शने फक्त सुरुवात असून जानेवारी २०२१ साली सरकारविरोधात पाकिस्तानमध्ये लाँग मार्च काढण्यात येईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. दरम्यान, या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इम्रान सरकारने गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानातील बड्या नेत्यांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली आहे.

तीव्र निदर्शने

दोन आठवड्यांपूर्वी ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-एन’, ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी’, ‘जमात उलेमा-ए-इस्लाम’ व इतर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तानातील इम्रान सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचे जाहीर केले होते. इम्रान यांचे सरकार इलेक्टेड अर्थात लोकनियुक्त नसून सिलेक्टेड अर्थात पाकिस्तानच्या लष्कराने निवडलेले असल्याची टीका या विरोधी पक्षांनी केली होती. या सरकारच्या काळात पाकिस्तानातील महागाईने कळस गाठला असून साध्या रोटीचे भाव देखील सामान्य जनतेच्या खिशाला परवडत नसल्याची टीका या विरोधी पक्षांनी केली होती. यासारख्या अनेक मुद्द्यांवरुन इम्रान सरकारला घेरण्यासाठी पाकिस्तानातील विरोधी पक्षांच्या ‘पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंट’ (पीडीएम) या संयुक्त आघाडीने शुक्रवारपासून देशव्यापी निदर्शने सुरू केली.

तीव्र निदर्शनेपाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या गुजरानवाला येथे आयोजित करण्यात आलेल्या या निदर्शनात पंजाब, सिंध, बलोचिस्तान, खैबर-पख्तूनवाला तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील जनता सहभागी झाले होते. मरियम नवाझ, बिलावल भुत्तो, मौलाना फझलूर रहमान यांचा काफिला गुजरानवाला येथे दाखल होण्याआधीच सरकारविरोधी निदर्शकांनी येथील स्टेडियम ‘गो नियाझी गो’च्या घोषणेने हादरवून सोडले. यावेळी ‘इम्रान खान चोर है’च्या घोषणाही देण्यात आल्या. तर पाकिस्तानी जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरुवात झालेली ही निदर्शने म्हणजे इम्रान यांच्या बनावटी सरकारच्या अखेरीची सुरुवात असल्याची टीका मरियम नवाझ यांनी केली. या निदर्शनांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या जनतेला त्यांचा हक्क मिळवून देण्यात येईल, असे जमात’चे प्रमुख मौलाना रहमान यांनी जाहीर केले. तसेच ही देशव्याप निदर्शनांची मोहीम असून जानेवारी २०२१ मध्ये पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतातून राजधानी इस्लामाबादपर्यंत लाँग मार्च काढण्याचे यावेळी घोषित करण्यात आले.

तीव्र निदर्शने

तर सरकारविरोधातील ही निदर्शने चिरडण्यासाठी ठिकठिकाणी कंटेनर आडवे करण्यात आले होते. तसेच या निदर्शनांवर कठोर मर्यादाही लावण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानी यंत्रणा देत आहेत. तर चोवीस तासांपूर्वी पाकिस्तानातील ४५० सरकारविरोधी जणांना अटक करण्यात आली आहे. पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांना आठवड्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले असून माजी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या अटकेचे आदेशही काढण्यात आले आहेत.

leave a reply