कम्युनिस्ट राजवटीची दडपशाही झुगारून चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तीव्र निदर्शने

कोरोना रुग्णसंख्येने ४० हजारांचा टप्पा ओलांडला

china protestsबीजिंग/शांघाय – चीनच्या सत्ताधारी राजवटीने जनतेवर उगारलेल्या कारवाईच्या बडग्यानंतरही कोरोना निर्बंधांविरोधातील चिनी नागरिकांमधील असंतोषाची धार कमी झालेली नाही. सलग तिसऱ्या दिवशी चीनच्या विविध शहरांमधील नागरिक अन्याय्य ‘झीरो कोविड पॉलिसी’विरोधात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. रविवारी रात्री तसेच सोमवारी चीनच्या १५हून अधिक शहरांमध्ये निदर्शनांचे लोण पसरल्याचे उघड झाले आहे. यात राजधानी बीजिंगपासून कोरोनाचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या वुहान शहरापर्यंतच्या भागांचा समावेश आहे. या वाढत्या प्रतिसादामुळे चीनच्या सत्ताधारी राजवटीत अस्वस्थता निर्माण झाली असून चिनी जनतेत दिसणारी नाराजी अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया चीनमधील माजी वरिष्ठ अधिकारी व्हिक्टर गाओ यांनी दिली.

गेल्या आठवड्यात झिंजिआंग प्रांतातील आगीच्या घटनेनंतर चिनी जनतेत ‘झीरो कोविड पॉलिसी’विरोधात असलेला असंतोष तीव्रतेने उफाळून वर आला. सुरुवातीला फक्त स्थानिक प्रशासनांना लक्ष्य करणाऱ्या निदर्शकांनी नंतर थेट सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील प्रमुख शहरांसह आघाडीच्या विद्यापीठांमध्ये त्याचे पडसाद उमटले. सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनी ‘ब्लँक पेपर’ हातात फडकवून निषेध नोंदविण्यास सुरुवात केली आहे. या निदर्शनांविरोधात सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने नेहमीच्या शैलीत कारवाईचा बडगा उगारला आहे.

रविवारपासून चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघाय तसेच इतर शहरांमध्ये निदर्शकांची धरपकड सुरू झाली. काही ठिकाणी निदर्शक व सुरक्षादलांमध्ये झटापट झाल्याचेही समोर आले आहे. आतापर्यंत हजाराहून अधिक निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही निदर्शक कारवाईत जखमी झाल्याचेही सांगण्यात येते. परदेशातील चिनी वंशाचे नागरिक व गटही कोरोनाविरोधी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. लंडन, पॅरिस तसेच अमेरिकेत चीनमधील निदर्शकांना पाठिंबा देणारे मोर्चे काढण्यात आले.

राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तिसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या महिन्याभरात कोविड आंदोलनाच्या रुपात त्यांना आव्हान मिळाल्याचा सूर विश्लेषकांमधून व्यक्त होत आहे. चीनमध्ये गेल्या साडेतीन दशकांमध्ये थेट सत्ताधारी राजवट अथवा राष्ट्राध्यक्षांना जबाबदार धरून इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांविरोधातील निदर्शने विशेष लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. चीनमधील माजी अधिकारीही आंदोलनाचे स्वरुप व व्याप्ती अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ने चीनमधील आंदोलनावर निवेदन जारी करून ‘झीरो कोविड पॉलिसी’ यशस्वी ठरत नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी जगातील प्रत्येकाला शांततामय मार्गाने निदर्शने करण्याचा हक्क असल्याचे अधोरेखित केले आहे.

दरम्यान, रविवारी चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे. राजधानी बीजिंगमध्ये जवळपास चार हजार रुग्ण आढळल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली असून गेले पाच दिवस बीजिंगमधील रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याकडे सूत्रांनी लक्ष वेधले आहे.

चीनच्या सुरक्षादलांकडून आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला मारहाण

बीजिंग/लंडन – गेल्या काही दिवसांपासून चीनच्या विविध शहरांमध्ये ‘झीरो कोविड पॉलिसी’विरोधात सुरू असणाऱ्या निदर्शनांचे वृत्तांकन करणाऱ्या एडवर्ड लॉरेन्स या पत्रकाराला पकडून मारहाण करण्यात आली. एडवर्ड लॉरेन्स ‘बीबीसी’च्या ‘चायना ब्युरो’साठी कॅमेरा ऑपरेटर म्हणून काम करतात. रविवारी शांघाय शहरातील निदर्शनांची माहिती घेत असताना चीनच्या सुरक्षादलांनी धक्काबुक्की करून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अनेक तास त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. लॉरेन्स यांच्याबरोबरच चीनच्या विविध शहरांमध्ये आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार तसेच फोटोग्राफर्सना धमकावण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स यांच्यावर झालेल्या कारवाईचा ब्रिटन सरकारने तीव्र शब्दात निषेध केला असून चीनकडे खुलासा मागितल्याचे सांगण्यात येते.

leave a reply