आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानशी कठोरतेने वागत आहे

- पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची तक्रार

इस्लामाबाद – पाकिस्तानची परकीय गंगाजळी गेल्या दहा वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर घसरली असून या देशाच्या तिजोरीत अवघे तीन अब्ज डॉलर्स शिल्लक राहिले आहेत. यातून अवघ्या काही दिवसांची आयात करणे पाकिस्तानला शक्य होईल. अशारितीने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची कोंडी झालेली असताना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला सहाय्य पुरविण्याच्या ऐवजी वाटाघाटींमध्ये कोंडी केलेली आहे, अशी तक्रार या देशाच्या पंतप्रधानांनी केली. इंधन व वीजेचे दर वाढवून आर्थिक शिस्तीसाठी इतर आवश्यक निर्णय घेतले नाही, तर कर्जसहाय्य मिळणार नाही, असे नाणेनिधीने याआधीच पाकिस्तानला बजावले होते.

पाकिस्तानच्या सरकारला काही दिवसांपूर्वी इंधनाचे तर एका दिवसात ३५ रुपयांनी वाढवावे लागले होते. त्याचा भयंकर परिणाम जनतेवर झाला आहे. जनता हे निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानच्या सरकारच्या नावाने खडे फोडत आहे. त्याच्या पाठोपाठ पाकिस्तानने वीजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढवावे अशी मागणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली. सध्या नाणेनिधीचे अधिकारी पाकिस्तानमध्ये असून त्यांची पाकिस्तानच्या सरकारशी चर्चा सुरू आहे. या वाटाघाटीत नाणेनिधीकडून शक्य तितक्या जलदगतीने काही अब्ज डॉलर्सचे कर्जसहाय्य मिळविण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे सरकार करीत आहे. मात्र आधीचे अनुभव लक्षात घेऊन नाणेनिधीने पाकिस्तानसमोर कठोर शर्ती ठेवल्या आहेत.

आत्तापर्यंत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २३ वेळा कर्जसहाय्य घेतले होते. प्रत्येक वेळी हे कर्ज घेताना पाकिस्तानने नाणेनिधीच्या शर्ती मान्य करण्याची तयारी दाखविली होती. पण यातील बऱ्याच शर्ती पाकिस्तानने मानण्यास नकार दिला. हा देश कुठल्याही परिस्थितीत आर्थिक शिस्त पाळायला तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर नाणेनिधीने नवे कर्ज देण्याच्या आधी, तुम्हीच कबुल केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवून दाखवा, असा इशारा पाकिस्तानच्या सरकारला दिला. यामुळे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सरकारला इंधनाचे दर ३५ रुपयांनी वाढवावे लागले होते. मात्र वीज दरवाढ केली, तर जनतेच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, याची पुरती जाणीव झालेले पाकिस्तानचे सरकार हा निर्णय घेताना कचरत आहे. त्यामुळेच नाणेनिधी आपल्या सरकारशी कठोरपणे वागत असल्याची तक्रार पंतप्रधान शाहबाज शरीफ करीत आहेत.

leave a reply