भारतात ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटचा शिरकाव

‘ओमिक्रॉन’च्या दोन रुग्णांपैकी एक स्थानिक नागरिक / ‘ओमिक्रॉन’चे आणखी रुग्ण सापडण्याची शक्यता / मुंबई विमानळावर उतरलेले पाच प्रवासी पॉझिटिव्ह

नवी दिल्ली/बंगळुरू – जागतिक आरोग्य संघटनेने चिंताजनक व्हेरिअंट असा उल्लेख केलेल्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटचा भारतात शिरकाव झाला आहे. कर्नाटकात ‘ओमिक्रॉन’चे दोन रुग्ण आढळले आहेत. यातील एक रुग्ण आफ्रिकेतून बंगळुरूमध्ये आलेला प्रवासी आहे, तर दुसरा स्थानिक असून त्याच्या परदेशी प्रवासाची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे कर्नाटकात ‘ओमिक्रॉन’चे आणखी रुग्ण असण्याची शक्यता बळावली आहे. आतापर्यंत २९ देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा हा व्हेरिअंट प्रचंड वेगाने पसरणारा असल्यामुळे या व्हेरिअंटचे पहिले रुग्ण आढळल्यानंतर देशातील आरोग्य यंत्रणासमोरील आव्हाने अधिकच वाढली आहेत.

गेल्या आठवड्यात बंगळुरू विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना ताबडतोब क्वारंटाईन करण्यात आले होते. जोखीम असलेल्या देशातून आलेल्या या प्रवाशांचे नमुने यानंतर जिनोम सिक्वेन्स तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एका प्रवाशांला डेल्टापेक्षा वेगळ्या व्हेरिअंटची बाधा झाल्याचे उघड झाले. मात्र त्याला नक्की कोणत्या व्हेरिअंटची बाधा झाली याचा खुलासा झाला नव्हता. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, तसेच बंगळुरू महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली आहे.

भारतात ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटचा शिरकाव‘ओमिक्रॉन’चे लागण झालेले दोन रुग्ण कर्नाटकात आढळले आहेत. यातील एक जण दक्षिण आफ्रिकेतून नागरिक असून नुकताच तो बंगळुरूमध्ये आला आहे, असे बंगळुरू महापालिकेने म्हटले आहे. तर दुसरा रुग्ण हा स्थानिक आहे. तसेच त्याच्या परदेशी प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे आणखी काही ‘ओमिक्रॉन’बाधीत बंगळुरूमध्ये असण्याची शक्यता वाढते, अशी भीती बंगळुरू पालिकेने वर्तविली असून त्यामुळे कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटबाबत आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचे बंगळुरू पालिकेने म्हटले आहे.

सापडलेला स्थानिक रुग्ण डॉक्टर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आणखी काही जण आल्याची शक्यता आहे. या दोन्ही रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या १३ जणांची, तर या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या २०३ जणांची ओळख पटविण्यात आली असून प्राथमिक संपर्कातील तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर इतरही दोन जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. या पाचही जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्स तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

कर्नाटकात सापडलेल्या ‘ओमिक्रॉन’च्या या रुग्णांचे वय ६६ आणि ४६ आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व त्याच्याबरोबर सहप्रवाशांचे ट्रेसिंग सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. तसेच घाबरून जाऊन नका. कोरोना प्रतिबंधक नियम पाळा आणि लस घेण्यास वेळ लावू नका, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले.

यावेळी ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना लसीचा बुस्टर डोस देणार का? या प्रश्‍नाचे उत्तर देताना नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही.के. पॉल यांनी सध्या दोन्ही लस देणे हेच सरकारचे मुख्य लक्ष्य आहे, असे स्पष्ट केले. कोरोनाची लस प्रत्येकाने घ्यायला हवी, ही सध्याच्या परिस्थितीची गरज आहे, असे पॉल म्हणाले. तर ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटबाबत अजून अभ्यास सुरू आहे. भारतातच नव्हे तर इतर देशातही ‘ओमिक्रॉन’ बाबत काही गोष्टी अस्पष्ट आहेत, असे पॉल म्हणाले. तसेच बुस्टर डोसबाबतही शास्त्रीय अभ्यास सुरू आहे, अशी माहिती पॉल यांनी दिली.

देशातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली घसरली आहे. दक्षिण पूर्व आशियात गेल्या एक आठवड्यात सापडलेल्या कोरोना रुग्णांपैकी केवळ ३.१ टक्के रुग्ण भारतातील आहेत. देशात ऍक्टिव्ह केसेसपैकी केरळ आणि महाराष्ट्रातच १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर एक ते १० हजार रुग्णसंख्या असलेल्या राज्यांची संख्या ९ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तसेच देशातील ८४.३ टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोनाची एक तरी लस लागली आहे. तर दोन्ही लस घेतलेल्यांची संख्या ४९ टक्क्यांवर पोहोचल्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लक्ष वेधले आहे.

दरम्यान, परदेशात मुंबईत आलेले आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबई विमानतळावर उतरल्यावर या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याआधी एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे परदेशातून आलेल्या आणि चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या सर्वांना सेव्हनहिल रुग्णालयात ठेवण्यात आले असून जिनोम सिक्वेसिंगसाठी त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची पालिकेने दिली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरीयातून आलेल्या एकाला व त्याच्या संपर्कात आलेल्या दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यांचेही नमुने जिनोम तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

leave a reply