इराण-अफगाणिस्तान सीमा तणावानंतर बंद

तेहरान/काबुल – इराणचे जवान आणि तालिबान यांच्यात सीमेवर झालेल्या चकमकीनंतर इराण अफगाणिस्तानची सीमा काही काळासाठी बंद करण्यात आली. तालिबान बेकायदेशीररित्या आमच्या हद्दीत रस्त्याचे बांधकाम करीत असल्याचा आरोप इराणने केला आहे. त्यानंतर इराणने अफगाणिस्तानच्या हेरात प्रांताला जोडलेली मुख्य सीमा बंद केली. अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरात प्रांतात इस्लाम काला जिल्ह्यात तालिबानने रस्ते बांधणीचे काम सुरु केले आहे.

इराण-अफगाणिस्तान सीमातालिबानचे हे बांधकाम इराणच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप अफगाणिस्तानविषयीचे इराणचे विशेष प्रतिनिधी हसन काझेमी कौमी यांनी केला. तर तालिबानचा स्थानिक कमांडर मौलवी हुमायु हेमात यांनी इराणवरच प्रत्यारोप केला. इराणच्या सीमा सुरक्षा जवानांनी अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा ठपका तालिबानच्या कमांडरने ठेवला. तालिबानने इराणच्या जवानांना ताब्यात घेतल्याच्या बातम्याही आल्या होत्या. यानंतर इराण-अफगाणिस्तान सीमेवर काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.

गेल्या ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर दुसऱ्यांदा असा तणाव निर्माण झाला आहे. त्यातही गेल्या महिनाभरामध्ये इराण आणि तालिबानच्या राजवटीत तेढ वाढत चालली आहे. तालिबानच्या भीतीने इराणमध्ये दाखल झालेल्या अफगाणींना इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स तालिबानविरोधी कारवाईसाठी शस्त्रसज्ज करीत असल्याचे दावे केले जातात. याशिवाय अफगाणी शरणार्थींवर इराण अत्याचार करीत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील इराणच्या दूतावासासमोर संतप्त निदर्शने झाली होती.

leave a reply