इराणचा इस्रायलसह आखाती देशांनाही इशारा

Iran-ballistic-missileतेहरान – ‘इराणवर हल्ला चढविण्यासाठी शेजारी किंवा कुठल्याही देशांचा वापर केला, तर इराण इस्रायलबरोबरच त्या देशावरही जोरदार हल्ला चढविल’, असा इशारा इराणच्या लष्कराचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाघेरी यांनी दिला. त्याचबरोबर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने ‘इस्रायलचा विनाश होवो’ असे लिहिलेल्या क्षेपणास्त्राचे प्रदर्शन करून नवी धमकी दिली. काही दिवसांपूर्वी ड्रोन हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या इस्फाहन शहरात इराणने हे क्षेपणास्त्र मांडले आहे.

गेल्या आठवड्यात इराणच्या इस्फाहन येथील शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर ड्रोन्सचे हल्ले झाले. यासाठी इस्रायल आणि कुर्द बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप इराणने केला होता. इराणच्या शेजारी देशांमध्ये या हल्ल्याची योजना तयार झाली व इस्फाहन जवळच्या भागातून ही कारवाई करण्यात आली, असा दावा इराणने केला होता. या पार्श्वभूमीवर, लष्कराचे प्रमुख मेजर जनरल बाघेरी यांनी इस्रायल तसेच शेजारच्या आखाती देशांना धमकावले आहे.

iran underground airbaseआखातातील घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या वृत्तसंस्थेने मेजर जनरल बाघेरी यांचा हा इशारा प्रसिद्ध केला. तर इराणची लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तसेच हवेतून मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्र शत्रूच्या रडार यंत्रणेलाही गुंगारा देऊ शकतात, असे इराणच्या हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडिअर जनरल हमीद वाहेदी यांनी म्हटले आहे. इराणची क्षेपणास्त्रे शत्रूची महत्त्वाची लष्करी ठिकाणे नष्ट करू शकतात, असा दावा वाहेदी यांनी केला.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी गुरुवारी इस्फाहन शहरात शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मांडले. या ठिकाणी उभ्या केलेल्या क्षेपणास्त्राच्या डमीवर ‘इस्रायलचा विनाश होवो’, असा संदेश छापून इस्रायलला धमकावल्याचे दिसत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी इराणने अंडरग्राऊंड अर्थात भूमीगत हवाईतळाचे फोटोग्राफ्स व व्हिडिओज्‌‍ प्रसिद्ध केले होते. यातील एक विमान क्रूझ क्षेपणास्त्राने सज्ज असल्याचे दाखविले होते. हा भूमिगत तळ अमेरिका व इस्रायलच्या बंकर बस्टर बॉम्बपासूनही सुरक्षित राहिल, असा दावा इराणच्या लष्कराने केला होता. तर शत्रू देशाने इराणवर हल्ला चढविलाच तर हा तळ इराणसाठी मोठी रणनीतिक खेळी ठरेल, असा दावा इराणच्या माध्यमांनी केला होता.

leave a reply