इराण आण्विक साहित्य आणि तंत्रज्ञानाची निर्यात करू शकतो

इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख

nuclear materials and technologyतेहरान – अणुकार्यक्रमाचा वेग तीव्र करणारा इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या अगदी जवळ पोहोचल्याचे इशारे इस्रायल देत आहे. त्याचबरोबर इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी युरोपातील मित्रदेशांना लष्करी कारवाईचा पर्याय इस्रायल सुचवित आहे. तर दुसरीकडे इराणने आपण न्यूक्लिअर हब अर्थात आण्विक केंद्र असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर आण्विक साहित्य आणि तंत्रज्ञानाची निर्यात करण्यावर विचार करीत असल्याचा दावा इराणने केला आहे. इराणच्या अणुप्रकल्पावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना, हा देश इतरांना आण्विक साहित्य आणि तंत्रज्ञानाची निर्यात करण्याची भाषा करीत आहे. हा इराणच्या ब्लॅकमेलिंगचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत.

राजधानी तेहरानमधील शहीद बेहिश्ती विद्यापीठात आयोजित केलेल्या ‘इरानियन न्यूक्लिअर कॉन्फरन्स’च्या निमित्ताने इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी आपला देश ‘न्यूक्लिअर हब’ असल्याचे जाहीर केले. गेल्या काही वर्षांमध्ये इराणच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित संशोधनविषयक संधी वाढल्या आहेत. आत्ताचा इराण रेडिओफार्मास्युटिकल्स आणि आण्विक साहित्यांची निर्यात करू शकतो, असे इस्लामी म्हणाले. देशाची निकड लक्षात घेऊन आवश्यक आण्विक तंत्रज्ञानाचा साठा करून अतिरिक्त साहित्य व तंत्रज्ञानाची निर्यात केली जाऊ शकते, असे इस्लामी यांनी स्पष्ट केले.

export nuclear materials and technologyगेल्या काही वर्षांपासून इराण वैद्यकीय वापरासाठी आवश्यक रेडिओफार्मास्युटिकल्सची निर्यात करीत आहे. पण इराण आण्विक साहित्य आणि तंत्रज्ञानाच्या निर्यातीत मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा इस्लामी यांनी केला. त्याचबरोबर पाश्चिमात्य देशांनी निर्बंध टाकलेल्या आण्विक साहित्यांची देखील निर्यात करणार असल्याचे इस्लामी यांनी स्पष्ट केले. इराणच्या अणुकार्यक्रमाची प्रगती खुंटीत करण्यासाठी इराणच्या वरिष्ठ अणुशास्त्रज्ञांची हत्या करण्यात आली आणि अणुप्रकल्पांवर हल्ले केले गेले. पण यानंतरही इराणचा अणुकार्यक्रम वेगाने पुढे गेला असून इराणचे शत्रू त्यांच्या प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्याचे इस्लामी पुढे म्हणाले.

आमचा अणुकार्यक्रम शांतीपूर्ण व नागरी वापरासाठी असल्याचा दावा इराण करीत आहे. अणुऊर्जा निर्मिती तसेच वैद्यकीय संशोधनासाठी अणुकार्यक्रम सहाय्यक ठरेल, असे इराणने म्हटले होते. पण इराण अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. इस्रायलच्या सरकारने संयुक्त राष्ट्रसंघ तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर इराणचा अणुकार्यक्रम इस्रायलसह जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असे वारंवार बजावले होते. तसेच अमेरिका व युरोपिय देशांनी इराणबरोबर अणुकरारासाठी वाटाघाटी करण्याऐवजी लष्करी कारवाईचा पर्याय निवडावा, असा निर्णायक इशाराही इस्रायल देत आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इराणवरील लष्करी कारवाईऐवजी वाटाघाटींना प्राधान्य दिले होते. पण काही आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने प्रसिद्ध केलेले अहवाल इराणचा अणुकार्यक्रम अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले युरेनिअमचे संवर्धन करण्यात यशस्वी ठरल्याचे सांगत आहे. यामुळे इस्रायलचा संयम संपत आला असून इराणवरील कारवाईच्या इस्रायल करीत असलेल्या मागणीला आखाती देशांचेही समर्थन लाभत असल्याचे दिसत आहे.

leave a reply