बायडेन येण्याचा नाही, तर ट्रम्प यांच्या जाण्याचा इराणला आनंद

- राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी

हसन रोहानीतेहरान – ‘ज्यो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होत आहेत म्हणून इराण अतिउत्साहित झालेला नाही. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाण्याने इराणला अत्यानंद झालेला आहे’, असे खोचक उद्गार इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी काढले आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दहशतवादी असल्याची टीका इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केली. अमेरिकेतील ‘इलेक्ट्रोरल कॉलेज’ने महिन्याभरापूर्वीच्या निवडणुकीत ज्यो बायडेन विजयी ठरल्याचे जाहीर केल्यानंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांची ही प्रतिक्रिया उमटली आहे. बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर, इराणच्या राष्ट्राध्यक्षांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते.

बुधवारी इराणच्या कॅबिनेट बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. ‘ट्रम्प हे अतिशय कपटी, जुलमी दहशतवादी, खूनी आणि अमेरिकेतील सर्वाधिक कायदे तोडणारे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रम्प यांच्याकडे सर्व नैतिक आणि मानवी मुल्यांचा अभाव होता’, असा आरोप इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याबद्दल रोहानी यांनी ईश्‍वराचे आभार मानले.

हसन रोहानी

त्याचबरोबर ट्रम्प यांनी लादलेल्या निर्बंधांमुळे इराण कोरोनाव्हायरसवरील लस घेण्यातही अपयशी ठरल्याचा ठपका रोहानी यांनी ठेवला. काही तासांपूर्वीच अमेरिकेने इराणवर नवे निर्बंध लादले आहेत. अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘एफबीआय’चा एजंट असल्याचा आरोप करून इराणने रॉबर्ट लेव्हिसन यांना अटक केली होती. इराणच्या कैदेत असतानाच लेव्हिसन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. लेव्हिसन यांच्या मृत्यूसाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप करून अमेरिकेने इराणच्या गुप्तचर यंत्रणेच्या दोन अधिकार्‍यांवर निर्बंध जाहीर केले. त्यानंतर रोहानी यांनी अमेरिकेवर हे ताशेरे ओढले आहेत.

पण इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर तोफ डागत असताना भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबाबत चिथावणीखोर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्याचबरोबर बायडेन यांच्या प्रशासनाशी अणुकरार करण्यास?इराण तयार होईल, असे संकेत राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी दिले. अमेरिका अणुकरारात सहभागी झाल्यानंतर पुढच्या तासाभरात इराणही यात सामील होईल, असे रोहानी म्हणाले. पण ही चर्चा सशर्त नसावी. इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत तडजोड होऊ शकणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी बजावले आहे.

हसन रोहानी

याआधीही इराणने बायडेन यांच्याशी जुळवून?घेण्याची तयारी दाखविली होती. तर काही आठवड्यांपूर्वी इराणमध्ये अणुशास्त्रज्ञाची हत्या झाल्यानंतर खवळलेल्या इराणला शांत राहण्याचे आवाहन अमेरिकेच्या ‘सीआयए’चे माजी प्रमुख जॉन ब्रेनन यांनी केले होते. बायडेन सत्तेवर येईपर्यंत इराणने शांत रहावे, असे ब्रेनन यांनी सुचविले होते.

दरम्यान, इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी उत्सुक असलेल्या बायडेन यांना इस्रायल आणि अरब देशांनी आधीच सावधानतेचा इशारा दिलेला आहे. अमेरिकन विश्‍लेषक देखील इराणबरोबर नव्याने अणुकरार करणे बायडेन यांच्यासाठी सोपे जाणार नाही, असे सांगत आहेत.

leave a reply