अणुकरारासाठी इराणला असलेली संधीची खिडकी बंद होत आहे

- फ्रान्सकडून इराणला समज

अणुकरारासाठी इराणलासंयुक्त राष्ट्र – ‘अणुकरारासाठी इराणला याहून चांगली ऑफर मिळणार नाही. आता ही संधी स्वीकारून निर्णय घ्यायचा की नाही, हे इराणने ठरवायचे आहे. पण इराणला दिलेली संधीची खिडकी पुन्हा बंद होत चालली आहे’, अशा परखड शब्दात फ्रान्सने इराणला समज दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी भेट घेऊन अणुकराराबाबत चर्चा केली. त्याआधी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना अणुकरारासाठी तयार असल्याचे म्हटले होते. पण या अणुकराराच्या मोबदल्यात इराणला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून हमी हवी असल्याची मागणी राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केली होती.

बायडेन यांच्यानंतरचे अमेरिकेचे कुठलेही राष्ट्राध्यक्ष कधीही या अणुकरारातून माघार घेऊ शकत नाहीत, असे इराणने आपल्या मागणीत म्हटले होते. पण ही मागणी मान्य करणे अशक्य असल्याचे बायडेन प्रशासनाने आधीच स्पष्ट केले होते. अणुकराराच्या वाटाघाटीत सहभागी असलेल्या फ्रान्सने इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या या मागणीवर प्रतिक्रिया नोंदविली तसेच इराणला अणुकरारासाठी घाई करण्याचे आवाहन केले.

अणुकरारासाठी इराणला‘2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी महिन्याभरापूर्वीच युरोपिय महासंघाने इराणला प्रस्ताव दिला होता. यापेक्षा चांगली ऑफर इराणला यापुढे मिळणार नाही. त्यामुळे इराणने या प्रस्तावाचा स्वीकार करावा’, असे फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्री कॅथरिन कोलोना यांनी खडसावले. त्याचबरोबर या अणुकरारासाठी पाश्चिमात्य देशांनी इराणला दिलेली ‘संधीची खिडकी’ पुन्हा बंद होत असल्याची जाणीव फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली.

इराणच्या नव्या मागण्यांमुळे अमेरिकेबरोबरचा अणुकरार गुंडाळला गेल्याच्या बातम्या अमेरिकी माध्यमांनी दिल्या होत्या. तसेच इराणवर कारवाई करण्यासाठी इस्रायलचे हात बांधलेले नाहीत, असेही अमेरिकेने जाहीर केले होते. त्यावर इस्रायलने समाधान व्यक्त केले होते. पण गेल्याच आठवड्यात बायडेन प्रशासनाने अणुकरार अजूनही शक्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर फ्रान्सने इराणला दिलेली समज या देशाबरोबरच्या अणुकराराची शक्यता अजूनही निकालात निघालेली नाही, असे संकेत देत आहे.

leave a reply