इराणने गुन्हेगारांना प्रत्युत्तर देण्याची घाई करू नये

- अमेरिकेच्या ‘सीआयए’चे माजी प्रमुख जॉन ब्रेनन यांचे आवाहन

वॉशिंग्टन – ‘इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या गुन्हा व अविवेकी कृत्य आहे. यामुळे क्षेत्रीय संघर्षाचा भडका उडण्याचा धोका निर्माण झाला आहे. इराणच्या नेत्यांनी या हत्येसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना प्रत्युत्तर देण्याची घाई करू नये. अमेरिकेतील जबाबदार नेतृत्वबदलाची इराणने प्रतिक्षा करावी’, असा सल्ला अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख जॉन ब्रेनन यांनी दिला. ‘सीआयए’च्या माजी प्रमुखांनी इराणला दिलेल्या या सल्लावर अमेरिकेतून टीका होत आहे. दरवेळी ‘अमेरिकेचा विनाश होवो’ अशी गरळ ओकणाऱ्या इराणच्या बाजूने ब्रेनन उभे असल्याचा आरोप अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर टेड क्रूझ यांनी केला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत जॉन ब्रेनन हे ‘सीआयए’ या अमेरिकेच्या मुख्य गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते. या ब्रेनन यांनी सोशल मीडियातील आपल्या प्रतिक्रियेतून जानेवारी महिन्यापर्यंत इराणच्या राजवटीला संयम राखण्याचा सल्ला दिल्याचा दावा केला जातो. 20 जानेवारी 2021 रोजी ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे बायडेन यांचे नेतृत्व इराणसाठी अनुकूल असेल, असे संकेत ब्रेनन देत असल्याचे दिसते.

तर आपल्या दुसऱ्या प्रतिक्रियेत ब्रेनन यांनी इराणी शास्त्रज्ञाच्या हत्येवर टीका केली. फखरीझादेह यांची हत्या दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप ब्रेनन यांनी केला. ही घटना आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून इतर देशांना परदेशी अधिकाऱ्यांवर हल्ले चढविण्यासाठी चिथावणी देणारी आहे, असा आरोप ब्रेनन यांनी केला. ब्रेनन यांच्या या सोशल मीडियावरील प्रतिक्रियेनंतर अमेरिकेत चांगलाच संघर्ष उभा राहिला आहे.

‘सीआयए’चे माजी प्रमुख सातत्याने इराणच्या कट्टरपंथियांच्या बाजूने उभे राहतात, हे फारच विचित्र आहे. इराणचे हेच कट्टरपंथीय अमेरिकेच्या विनाशाच्या घोषणा देतात. इस्रायलबाबतीतही इराणच्या या कट्टरपंथियांनी अशाच घोषणा दिल्या आहेत, याची आठवण रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ सिनेटर टेड क्रूझ यांनी करुन दिली. त्यामुळे इराणवरून अमेरिकेच्या राजकारणात दोन गट एकमेकांवर सडकून टीका करू लागल्याचे चित्र आत्तापासूनच समोर येत आहे.

leave a reply