इस्रायलला कमकुवत करू पाहणारा इराण अपयशीच ठरेल

- इस्रायलचे नवे संरक्षणमंत्री युआव गॅलाँट

तेल अविव – अण्वस्त्रे मिळविण्यासाठी इराण करीत असलेली धडपड असो की गाझापट्टीतून इस्रायलवर होणाऱ्या रॉकेट्सचा मारा असो, या सर्वांच्या मागे एकच ध्येय आहे. ते म्हणजे काहीही करून इस्रायलला कमकुवत करणे. पण इराण व इराणसाठी काम करणाऱ्या संघटनांचे हे ध्येय कधीही पूर्ण होऊ शकत नाही, ते अपयशीच ठरतील, असा इशारा इस्रायलचे नवे संरक्षणमंत्री युआव गॅलाँट यांनी दिला आहे. आधीचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांच्याकडून संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारीत असताना युआव गॅलाँट यांनी केलेली ही विधाने लक्षवेधी ठरत असल्याचा दावा इस्रायलच्या वर्तमानपत्रांनी केला आहे.

आयडीएफ अर्थात ‘इस्रायल डिफेन्स फोर्सेस’चे कामकाज राजकारणाच्या कक्षेत कधीही येता कामा नये, अशी अपेक्षा बेनी गांत्झ यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार गॅलाँट यांनी संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारत असताना, आयडीएफच्या धोरणात सातत्य राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. माजी पंतप्रधान येर लॅपिड यांचे सरकार जाऊन बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार सत्तेवर येत असताना, आजी व माजी मंत्री एकमेकांपासून चार हात लांब राहण्याचा राजकीय सावधपणा दाखवित आहेत. पण माजी लष्करी अधिकारी असलेले बेन गांत्झ व युआव गॅलाँट यांच्यात फार मोठा समन्वय असल्याचे सांगून इस्रायली वर्तमानपत्रांनी यामुळे आयडीएफची धोरणे व कारवायांमध्ये विशेष बदल होणार नसल्याचे संकेत मिळत असल्याचा दावा केला.

संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हाती घेत असताना, युआव गॅलाँट यांनी इराणचा अणुकार्यक्रम व इराणसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून इस्रायलवर करण्यात येत असलेला रॉकेट्सचा मारा, या साऱ्यांच्या मागे समान सूत्र असल्याचे बजावले. कुठल्याही परिस्थितीत इस्रायलला कमकुवत करण्याचे ध्येय या साऱ्यांच्या मागे आहे, असे सांगून गॅलाँट यांनी इराणवर सडकून टीका केली. इराण अण्वस्त्रे मिळविण्यासाठी धडपड करीत असताना इस्रायलच्या सर्वनाशाचीही घोषणा सातत्याने करीत आहे, याकडेही गॅलाँट यांनी लक्ष वेधले. तसेच इराणबरोबर समन्वय राखून इस्रायलवर हल्ले चढविणाऱ्या गाझापट्टीतील दहशतवादी संघटनांवर घनघोर हल्ले चढविले जातील, असे संरक्षणमंत्री गॅलाँट यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, इराणकडे अण्वस्त्रे आली तर इस्रायलच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण होईल आणि कुठल्याही परिस्थिती इस्रायल तसे होऊ देणार नाही, असा इशारा पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी फार आधीच दिला होता. नुकत्याच पार पडलेल्या इस्रायलमधील निवडणुकीत नेत्यान्याहू यांनी अतिउजव्या व जहालमतवादी राजकीय पक्षांबरोबर आघाडी करून बहुमत मिळवले होते. त्यामुळे हे जहाल नेते आता पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या मंत्रिमंडळाचा भाग बनले असून ते इस्रायलवर हल्ले चढविणाऱ्या पॅलेस्टिनी संघटनांबरोबरच इराणच्या विरोधात आक्रमक कारवाईसाठी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. संरक्षणमंत्री युआव गॅलाँट यांच्या विधानातून तसेच संकेत मिळत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला आपल्या अणुप्रकल्पांवर इस्रायलने हल्ला चढविलाच, तर इस्रायलवर हजारो रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून इस्रायलचा दिमोना अणुप्रकल्प नष्ट करण्यात येईल, अशा धमक्या इराणकडून दिल्या जात आहेत. यामुळे पर्शियन आखातातील तणाव पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात वाढू लागला असून इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमुळे या देशाच्या राजवटीच्या आक्रमकतेत अधिकच वाढ झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत युआव गॅलाँट यांची विधाने या क्षेत्रातील तणावात नवी भर घालत असल्याचे दिसते.

leave a reply