इराणकडून ‘आयएईए’ निरिक्षकांच्या हकालपट्टीचा इशारा

तेहरान – अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्तासूत्रे हाती घेण्याआधीच इराणने त्यांना इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व निर्बंध वेळीच मागे घेतले नाही तर, अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांची (आयएईए) इराणमधून हकालपट्टी केली जाईल. यासाठी अमेरिकेला २१ फेब्रुवारीपर्यंतची ‘डेडलाईन’ दिल्याचे इराणने सुनावले आहे. तर आयोगाच्या निरिक्षकांना रोखण्याचा अधिकार इराणला नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी फटकारले आहे.

महिन्याभरापूर्वी इराणमध्ये अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या करण्यात आली होती. फखरीझादेह यांच्या हत्येसाठी इराणने अमेरिका आणि इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर अणुशास्त्रज्ञाच्या हत्येनंतर इराणच्या संसदेमध्ये अणुकार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये फोर्दो अणुप्रकल्पात युरेनियमचे संवर्धन सुरू करणे तसेच २०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन करून युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या व्यतिरिक्त अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना अणुप्रकल्पात प्रवेश मिळणार नाही, असे जाहीर केले होते.

याच आठवड्यात इराणने फोर्दो अणुप्रकल्पात युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत नेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर १००० सेंट्रीफ्यूजेसवरही काम सुरू केल्याची घोषणा इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केली होती. गेल्या महिन्याभरातील इराणच्या या हालचाली २०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन असल्याची टीका अमेरिकेसह, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने केली होती. त्याचबरोबर इराणने अणुकराराच्या मर्यादेत रहावे, असे युरोपिय देशांनी बजावले होते.

पण इराणच्या अटी मान्य केल्याशिवाय युरेनियमचे संवर्धन थांबणार नसल्याचे इराणने ठणकावले आहे. त्याचबरोबर, अमेरिकेने इराणच्या आर्थिक, बँकिंग आणि इंधन क्षेत्रावर लादलेले सारे निर्बंध मागे घेतले नाही तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना इराणमधून हाकलून दिले जाईल, असा इशारा इराणचे संसद सदस्य अहमद अमिराबादी फराहानी यांनी दिला. इराणची मागणी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेकडे २१ फेब्रुवारीपर्यंतची मुदत असल्याचे फराहानी म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या मागण्यांना महत्त्वही देत नाहीत, हे इराणलाही ठाऊक आहे. त्यामुळे इराणने २१ फेब्रुवारीची मुदत अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष व अणुकराराच्या समर्थनात असलेले ज्यो बायडेन यांच्यासाठी असल्याचा दावा केला जातो. पण अमेरिकेत सत्ताबदल होत असून २० जानेवारी रोजी ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. बायडेन अमेरिकेच्या सत्तेवर आल्यानंतर महिन्याभरात इराणवरील निर्बंध काढणे अवघड असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे इराणने डेडलाईन देऊन बायडेन यांची कोंडी केल्याचे दिसत आहे.

leave a reply