इराणच्या सरकारने दोन निदर्शकांना फाशी दिली

इराणमधील अल्पसंख्यांकांचे निदर्शकांवरील कारवाई थांबविण्याचे आवाहन

iran khameneiतेहरान – हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या जवानाची हत्या केल्याचा आरोप करुन इराणने दोन निदर्शकांना फाशी दिली. त्याचबरोबर अमेरिका व युरोपिय महासंघाने निर्बंध लादलेल्या लष्करी अधिकाऱ्यांची इराणच्या पोलीस प्रमुखपदी निवड झाली आहे. याद्वारे इराणचे सरकार निदर्शकांविरोधातील कारवाई थांबविणार नसल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. पण इराणच्या राजवटीने त्वरीत निदर्शकांवरील कारवाई रोखावी, अन्यथा नव्या निदर्शनांचा भडका उडेल, असा इशारा इराणमधील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक नेत्यांनी दिला आहे.

iran protests-1इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात पेटलेल्या निदर्शनांना 113 दिवस उलटले आहेत. इराणच्या सरकारने माध्यमांवर बंदी लादल्यामुळे येथील निदर्शनांची सविस्तर माहिती जगासमोर येण्यास वेळ लागत आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणमधील निदर्शनांची माहिती प्रसिद्ध होत आहे. गेल्या महिन्यात इराणच्या सरकारने सार्वजनिकरित्या निदर्शने करण्यास बंदी लादल्यानंतरही इराणच्या 80 हून अधिक शहरांच्या रस्त्यांवर हिजाबसक्तीच्या विरोधात निदर्शने सुरूच आहेत.

iran protestersया निदर्शनांमध्ये किमान 600 जणांचा बळी गेला असून 25 हजारांहून अधिक जणांना अटक केल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर इराणच्या सरकारने अटकेतील निदर्शकांवर दोष निश्चित करून त्यांना फाशी देण्याची प्रक्रिया तीव्र केली आहे. काही दिवसांपूर्वी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या जवानावर हल्ला चढविण्याप्रकरणी इराणच्या न्यायालयाने मोहम्मद महदी करामी आणि सईद मोहम्मद हुसैनी यांना फाशी सुनावून शनिवारी त्याची अंमलबजावणीही करण्यात आली.

पण फाशीवर जाणाऱ्या निदर्शकांच्या कुटुंबियांची मुलाखत प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकाराला देखील इराणच्या यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. तर इराणच्या कारागृहात बंद असलेल्या निदर्शकांवर अनन्वित अत्याचार होत असल्याचा दावा परदेशी आश्रय घेतलेल्या इराणवंशियांकडून होत आहे. महिला व मुलींवर भीषण अत्याचार झाल्याचे इराणमधील राजवटविरोधी गट करीत आहेत. निदर्शकांची बाजू घेऊन न्यायालयात दाद मागणाऱ्या वकिलांवर देखील कारवाई सुरू असल्यामुळे निदर्शक कोंडीत सापडले आहेत. तर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या आदेशानंतर इराणच्या पोलीसप्रमुखपदावर वादग्रस्त अधिकाऱ्यांची निवड झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून सुरू असणाऱ्या कारवाया इराणच्या राजवटीने रोखाव्यात, असे आवाहन इराणमधील अल्पसंख्यांकांचे धार्मिक नेते, प्रभावी व्यक्ती आणि समर्थकांनी केले आहे. इराणमधील परिस्थिती तितकीशी गंभीर बनलेली नाही. पण वेळीच यावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलो तर इराणमध्ये निदर्शने व त्याबरोबरच हिंसेचा नवा भडका उडेल, असे या नेत्यांनी बजावले आहे.

leave a reply