आयएसआयने मुल्ला ओमरच्या मुलाला तालिबानचा प्रमुख बनविले

काबूल – मुल्ला ओमर याचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब याने तालिबानची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्यामुळे याकूबकडे ही सूत्रे देण्यात आल्याचा दावा केला जातो. पण पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने याकूब याला अफगाण तालिबानच्या प्रमुख पदावर बसविले आहे, असा आरोप अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख रहमतुल्ला नबील यांनी केला. याकूबच्या या निवडीबरोबर ‘आयएसआय’ने तालिबानवरील आपली पकड अधिक घट्ट केल्याचा इशारा नबील यांनी दिला आहे.

मुल्ला ओमर

तालिबानमध्ये सध्या मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली असून यामध्ये मुल्ला ओमरचा सहाय्यक आणि तालिबानचा सध्याचा प्रमुख हैबतूल्ला अखुंदझादा याचा समावेश आहे. त्याच्या जागी ‘आयएसआय’ने हक्कानी नेटवर्कचा नेता सिराजुद्दीन हक्कानी याला तालिबानच्या प्रमुखपदी बसविले होते. पण सिराजुद्दीन हक्कानी आणि त्याचे सहकारी देखील कोरोनाग्रस्त झाले आहेत, अशी माहिती नबील यांनी दिली.

हक्कानी याच्यानंतर तालिबानची सूत्रे शुरा कौन्सिलकडे गेली, तर या संघटनेवरील आपली पकड कायमची ढिली होईल, अशी चिंता ‘आयएसआय’ला सतावीत होती. म्हणूनच ‘आयएसआय’ने मुल्ला ओमरचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब यांच्याकडेच या संघटनेची सूत्रे सोपवली आहेत, असा दावा नबील यांनी केला. पाकिस्तानी लष्कराच्या प्रचाराची धुरा संभाळणाऱ्या ‘आयएसपीआर’ने याकूबच्या या निवडीची प्रचार मोहीम सुरू केली आहे. याकूबच्या निवडीबरोबरच ‘आयएसआय’ने दोहा येथील तालिबानच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची तयारी केली आहे, असा दावा नबील आणि पाश्चिमात्य माध्यमांनी केला आहे.

२०१५ साली मुल्ला ओमरचा मृत्यू झाल्यानंतरच याकूब याला तालिबानच्या प्रमुखपदी निवड करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण तालिबानमधील काही प्रभावी नेत्यांनी त्याला विरोध केल्यानंतर याकूबकडे अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांची सूत्रे सोपवण्यात आली होती. त्यामुळे तालिबानमधील याकूब समर्थक नाराज होते. मात्र, आता ‘आयएसआय’ने याकूबला तालिबानच्या प्रमुख पदावर नेऊन ठेवल्यामुळे या गटावरील आयएसआयची पकड अधिकच घट्ट झाल्याचा इशारा नबील यांनी दिला. अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी ही चांगली घडामोड नसल्याचे नबील यांनी बजावले आहे आणि पाश्चिमात्य माध्यमांनी त्याला दुजोरा आहे.

तालिबानमध्ये फार मोठे गटतट असून अमेरिकेबरोबर तालिबानने केलेल्या शांतीकराराला तालिबानमधील काही गटांचा तीव्र विरोध आहे. यामुळे तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत आयएसआयने याकूब याची तालिबानच्या प्रमुखपदी नियुक्ती करुन पुन्हा एकदा तालिबानच्या नेतृत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

leave a reply