‘एनआयए’कडून ‘आयएसआय’च्या हस्तकाला अटक

नवी दिल्ली – विशाखापट्टणम येथील नौदलाच्या तळावर हेरगिरी करून गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पोहोचविणाऱ्या हेराला ‘राष्ट्रीय तपास संस्था’ने (एनआयए) अटक केली आहे. गेल्यावर्षी विशाखापट्टणमध्ये भारतीय नौदलाची हेरगिरी करणारे मोठे रॅकेट उद्धवस्त करण्यात आले होते. या प्रकरणात १४ आरोपींविरोधात या आधीच आरोपपत्र दाखल झाले आहे. याच हेरगिरी प्रकरणाशी सोमवारी अटक करण्यात आलेल्या ‘आयएसआय’च्या हस्तकाचा संबंध असल्याची बातमी आहे.

'आयएसआय'

एनआयए‘ने गुजरातच्या गोध्रामधून गितेली इमरानला हेरगिरी प्रकरणात ताब्यात घेतले. गुन्हेगारीचा कट, दहशतवादी कारवायांसाठी निधी आणि संवेदनशील माहिती ‘आयएसआय’ ला पुरविल्याच्या आरोप त्याच्यावर आहे. त्याच्या घरातून डिजिटल उपकरणे आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

'आयएसआय'२०१९ सालच्या डिसेंबर महिन्यात विशाखापट्टणमध्ये ‘आयएसआय’चे आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्दवस्त करण्यात आले. ‘आयएसआय‘चे पाकिस्तानातील हेर भारतातल्या तरुणांची हस्तक म्हणून भरती करायचे. या हस्तकांद्वारे भारतीय नौदलाच्या युद्धनौका, विनाशिका आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती मिळविली जात होती. काही नौदल कर्मचारी ‘आयएसआय’च्या हस्तकांच्या संपर्कात आले होते. या हेरगिरी प्रकरणात आणखी काही जणांना अटक होऊ शकते, असे ‘एनआयए’ने स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच ‘एनआय’ने या प्रकरणी ‘आयएसआय’च्या दोन हस्तकांना अटक केली होती.

दरम्यान, भारतीय सुरक्षादलांनी पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे स्लिपर सेल्स मोडून काढले आहेत. सुरक्षा दलाच्या कारवाईच्या भितीने स्लिपर सेल भारतात कारवाई करीत नाहीत. त्यामुळे ‘आयएसआय’ अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे स्थानिक गुंड आणि समाजकंटकांच्या सहाय्याने ‘आयएसआय’ भारतात हल्ले घडविण्याचा कट रचत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply