ब्रिटनमध्ये असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या टीकाकारांना संपविण्याचा आयएसआयचा कट – ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणेचा इशारा

सुरक्षा यंत्रणा

लंडन/इस्लामाबाद – पाकिस्तानी लष्करावर टीका करणार्‍या व परदेशात वास्तव्य करणार्‍या पत्रकार तसेच कार्यकर्त्यांची ‘हिट लिस्ट’ तयार करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ या दैनिकाने ब्रिटीश सुरक्षायंत्रणांच्या हवाल्याने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार सत्तेवर आल्यानंतर ही योजना आखण्यात आली असून, लष्करावर टीका करणार्‍यांसह बलोचिस्तान व पश्तू चळवळीतील कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. ब्रिटनचे पाकिस्तानमधील माजी उपायुक्त असलेल्या मार्क ग्रँट यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचा दावा केला असून ब्रिटन सरकारने यात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी लंडनमध्ये एका ब्रिटीश-पाकिस्तानी तरुणाला अटक करण्यात आली होती. हा तरुण नेदरलॅण्डहून ब्रिटनमध्ये आला होता. नेदरलॅण्डमध्ये राहणार्‍या अहमद गोराया नावाच्या पाकिस्तानी वंशाच्या कार्यकर्त्याच्या हत्येची योजना सदर तरुणाने आखल्याचे चौकशीतून समोर आले. या घटनेनंतर ब्रिटन तसेच युरोपातील पाकिस्तानी वंशाचे कार्यकर्ते, पत्रकार तसेच लष्करावर टीका करणारे यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी पाकिस्तानी लष्कर व गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ पाकिस्तानमध्ये वास्तव्य करणार्‍या टीकाकार व पत्रकारांच्या हत्या घडवित असल्याचे समोर आले होते. मात्र गेल्या काही वर्षात परदेशातील पाकिस्तानी वंशाच्या टीकाकारांनाही लक्ष्य करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

सुरक्षा यंत्रणामे २०२०मध्ये स्वीडनमध्ये राहणार्‍या साजिद हुसेन या बलोच पत्रकाराची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी कॅनडात करिमा बलोच या बलोच महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. स्वीडन तसेच कॅनडाच्या यंत्रणांनी या हत्येमागे कट असल्याचे नाकारले होते. मात्र पाकिस्तानी वंशाच्या टीकाकारांमध्ये यामुळे दहशत निर्माण झाली आहे. लंडन पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पाकिस्तानी वंशाचे पत्रकार व कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असल्याची कबुली दिली आहे. आयेशा सिद्दीका यांना या पथकाकडूनच ‘वॉर्निंग’ देण्यात आल्याचे समोर आले आहे.

सिद्दीका यांच्या व्यतिरिक्त गुल बुखारी या पाकिस्तानच्या पत्रकार महिलेलाही धोका असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानात असताना बुखारी यांचे अपहरणही झाले होते. त्यानंतर २०१८ साली तत्या ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या. बुखारी यांनी आपल्या घराचा पत्ता दुसर्‍या कुणालाही देऊ नये, असे त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ब्रिटनबरोबरच फ्रान्स तसेच जर्मनीमध्ये वास्तव्य करणार्‍या पत्रकार व कार्यकर्त्यांना धोका असल्याचेही समोर येत आहे. ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्स’ या गटानेही पाकिस्तानी वंशाच्या पत्रकारांना मिळणार्‍या धमक्यांची दखल घेतली असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हंटले आहे.

गेल्या वर्षी पाकिस्तानी सरकारने एक मेमो प्रसिद्ध करून, युरोप व अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाचे पत्रकार परदेशी प्रसारमाध्यमांमधून सरकारविरोधी मोहीम चालवित असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर लष्कर तसेच आयएसआयच्या हस्तकांकडून धमक्या मिळण्यास सुरुवात झाल्याचे युरोपातील एका पत्रकाराने स्पष्ट केले. ‘ब्रिटनमधील पत्रकारांवर बेकायदा माध्यमातून दडपण आणण्यात येत असेल तर ब्रिटन सरकार व सुरक्षायंत्रणांनी ही बाब गंभीरपणे घ्यायला हवी आणि कारवाई करणे गरजेचे आहे. आयएसआयकडून पाकिस्तानी नागरिकांना धमकावण्यात येत असेल तर ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही’, असे ब्रिटनचे पाकिस्तानमधील माजी उपायुक्त असलेल्या मार्क ग्रँट यांनी बजावले आहे.

leave a reply