संरक्षणमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांपाठोपाठ इस्रायलच्या मोसादचे प्रमुख लवकरच अमेरिकेला भेट देणार

मोसादचे प्रमुखजेरूसलेम – इस्रायलचे संरक्षणमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अमेरिका दौऱ्यानंतर आता इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख डेव्हिड बर्निया देखील अमेरिकेला भेट देणार आहेत. अमेरिका व पाश्चिमात्य देश इराणबरोबर करीत असलेला अणुकरार अत्यंत वाईट असल्याची उघडपणे टीका करणाऱ्या मोसादच्या प्रमुखांची ही अमेरिका भेट लक्षवेधी ठरते आहे. या अणुकरारात इस्रायलला अपेक्षित असलेले बदल स्पष्टपणे मांडण्यासाठी डेव्हिड बर्निया अमेरिकेत जात असल्याचे दावे इस्रायली माध्यमे करीत आहेत.

इराणबरोबरील अणुकरार सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे दावे केले जातात. अमेरिका व युरोपिय देशांसह इराणनेही त्याला दुजोरा दिलेला आहे. मात्र हा अणुकरार इराणचा अणुकार्यक्रम रोखणार नाही, तर पुढे नेणारा असून यामुळे लवकरच इराण अण्वस्त्रसज्ज देश बनेल, असा इशारा इस्रायल देत आहे. इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी नेमक्या शब्दात अमेरिकेला व युरोपिय देशांना याची जाणीव करून दिली आहे. इतकेच नाही तर पाश्चिमात्य देश इराणबरोबर करीत असलेल्या अणुकराराला इस्रायल बांधिल नसेल. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढवू शकेल, असा इशारा पंतप्रधान लॅपिड यांनी दिला होता. इस्रायलच्या संरक्षणदलांसह मोसादला यासाठी पूर्णपणे सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, असे पंतप्रधान लॅपिड यांनी म्हटले होते.

याच्याही पुढे जाऊन मोसादचे प्रमुख डेव्हिड बर्निया यांनी इराणच्या अणुप्रकल्पावरील कारवाईची पूर्ण तयारी असल्याचे जाहीर करून टाकले होते. यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका व युरोपिय देशांबरोबरील इस्रायलचे मतभेद टोकाला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र याबाबत इस्रायलमध्ये आधी सत्तेवर असलेले माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याप्रमाणे उघड आक्रमक भूमिका स्वीकारायला इस्रायलचे सध्याचे सरकार तयार नाही. अजूनही इस्रायलचे पंतप्रधान लॅपिड यांचे सरकार अमेरिका व युरोपिय देशांवर जहाल शब्दात टीका करण्याचे टाळून राजनैतिक वाटाघाटींच्या मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचासारखा इस्रायलचा दुसरा मित्र नाही, असा निर्वाळा इस्रायली पंतप्रधानांनी नुकताच दिला होता. मात्र अमेरिका इराणबरोबर करीत असलेला अणुकार राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीच आखलेल्या ‘रेड लाईन’ अर्थात मर्यादेचे उल्लंघन करणारा आहे, कारण या अणुकरारामुळे इराण लवकरच अण्वस्त्रसज्ज बनेल, ही बाब इस्रायलच्या पंतप्रधान लॅपिड यांनी लक्षात आणून दिली होती. म्हणूनच इराणबरोबर असा वाईट अणुकरार न करता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यातून माघार घ्यावी, असे आवाहन लॅपिड यांनी केले होते.

इस्रायलच्या पंतप्रधानांकडून असे संदेश अमेरिकेला दिले जात असतानाच, इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार इयाल हुलाता यांनी अमेरिकेचा दौरा करून या अणुकराराच्या विरोधात ठाम भूमिका मांडली होती. त्यानंतर आता मोसादचे बहुचर्चित प्रमुख डेव्हिड बर्निया अमेरिकेच्या दौऱ्यावर चालले असून त्यांची भेट अधिकच लक्ष वेधून घेणारी ठरते. कारण बर्निया यांनी इराणच्या अणुप्रकल्पांवर लष्करी कारवाईची हमासची तयारी असल्याचे जाहीर केले होते. तसेच इराणबरोबरील अमेरिकेच्या या अणुकराराच्या विरोधात बर्निया यांनी अतिशय आक्रमक भूमिका स्वीकारलेली आहे. त्यामुळे त्यांच्या अमेरिका दौऱ्यात नक्की काय होईल, याकडे इस्रायली विश्लेषक व माध्यमांचे लक्ष लागलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला इराण देखील अमेरिका व इस्रायलमधील या चर्चेकडे अत्यंत सावधपणे पाहत आहे.

अमेरिका व पाश्चिमात्यांनी इराणबरोबर अणुकरार केला तरी आपण त्याला बांधिल नसल्याचे दावे इस्रायलकडून केले जात असताना, इराण देखील अणुकरारामुळे आपली इस्रायलबाबतची भूमिका बदलणार नाही, असे इशारे देत आहे.

leave a reply