इराणच्या अणुकराराच्या मुद्यावर संबंधांना धक्का न लागू देता इस्रायल अमेरिकेवर दबाव टाकत आहे

जेरूसलेम – अमेरिकेबरोबरील संबंधांना धक्का लागू न देता, इस्रायल इराणच्या अणुकराराच्या मुद्यावर अमेरिकेवरील दबाव वाढवित आहे, असा दावा इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी केला. आरडाओरडा न करता शांतपणे अमेरिकेसमोर इस्रायलने इराणच्या अणुकराराविरोधात ठाम भूमिका स्वीकारली. याचे परिणाम दिसू लागले असून अमेरिका इस्रायलचे म्हणणे ऐकून घेत आहे. मात्र आधीच्या सरकारने या मुद्यावर इतकी आक्रमकता दाखवली होती की त्यावेळी अमेरिकेने इस्रायलचे ऐकून घेणेच बंद केले होते, असा दावा पंतप्रधान लॅपिड यांनी केला.

अमेरिका इराणबरोबर नव्याने करीत असलेल्या अणुकराराचा मुद्दा केवळ इस्रायलच्या सुरक्षेपुरता मर्यादित नसून यावरून इस्रायलमध्ये अंतर्गत राजकारण तापले आहे. माजी पंतप्रधान बेंजमिन नेत्यान्याहू व इस्रायलच्या विरोधी पक्षाचे जहाल नेते सध्याच्या पंतप्रधान लॅपिड यांच्या सरकारला धारेवर धरत आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देश इराणबरोबर अणुकरार करीत असताना, इस्रायलच्या सरकारची यावरील भूमिका अतिशय सौम्य असल्याचा ठपका या सर्वांनी ठेवला आहे. या आक्षेपाला पंतप्रधान लॅपिड यांनी उत्तर दिले.

इस्रायल अमेरिकेबरोबरील संबंधांना धक्का न देता, इराणबरोबरील अणुकराराच्या मुद्यावर अमेरिकेवर दबाव वाढवित आहे. हा आपल्या सरकारच्या राजनैतिक कौशल्याचा भाग असल्याचे पंतप्रधान लॅपिड यांचे म्हणणे आहे. याआधी पंतप्रधानपदावर असलेल्या बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इराणच्या अणुकराराविरोधात अतिशय जहाल भूमिका स्वीकारली होती. या मुद्यावर त्यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली आणि त्याचा विपरित परिणाम इस्रायलच्या अमेरिकेबरोबरील संबंधांवर झाला होता. यामुळे अमेरिकेने इस्रायलचे ऐकण्याचे बंद केले. त्यामुळे नेत्यान्याहू यांचे हे धोरण इस्रायलवरच उलटले होते आणि याने इस्रायलचेच नुकसान झाले, असा दावा पंतप्रधान लॅपिड यांनी केला. मात्र आत्ताच्या काळातील परिस्थिती बदलली असून इस्रायलचे आक्षेप अमेरिका लक्षात घेत आहे. जहाल भाषणे आणि वादावादीपेक्षा इस्रायलच्या सरकारने स्वीकारलेली ही भूमिका अधिक फलदायी ठरते आहे, असे पंतप्रधान लॅपिड पुढे म्हणाले. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर ज्यो बायडेन यांनी जगभरातील प्रमुख नेते व अमेरिकेच्या सहकारी देशांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली. पण त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान असलेल्या बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी त्यांनी बराच काळ चर्चा केली नव्हती. इराणबरोबरील अणुकराराचे समर्थन करणारे बायडेन यांच्याबाबत नेत्यान्याहू यांचे चांगले मत नसल्याचे वारंवार उघड झाले होते. याचा परिणाम अमेरिका व इस्रायलच्या संबंधांवर झाला होता.

पुढच्या काळात इस्रायलमध्ये राजकीय उलथापालथी झाल्या व नेत्यान्याहू यांचे सरकार गडगडले आणि त्यांच्या जागी येर लॅपिड इस्रायलचे पंतप्रधान बनले. यानंतर बायडेन प्रशासनाबरोबरील इस्रायलच्या सरकारचे संबंध सुधारले. त्याच प्रमाणात इस्रायलचे रशियाबरोबरील संबंध ताणले गेलेले आहेत, ही लक्षणीय बाब ठरते. त्यामुळे इस्रायलच्या अंतर्गत राजकारणात होणाऱ्या फेरबदलांचा इस्रायलच्या अमेरिका तसेच इतर देशांबरोबरील संबंधांवर फार मोठा प्रभाव पडत असल्याचे समोर येत आहे.

असे असले तरी इराणच्या अणुकार्यक्रम व अमेरिका आणि पाश्चिमात्य देश इराणबरोबर करीत असलेल्या अणुकराराच्या मुद्यावर इस्रायलच्या धोरणात विशेष फरक नाही. कुठल्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, या भूमिकेवर पंतप्रधान येर लॅपिड देखील ठाम आहेत. त्याचवेळी आवश्यकता भासल्यास अमेरिकेच्या विरोधात जाऊनही इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविल, असा इशारा पंतप्रधान लॅपिड यांनी अनेकवार दिला होता.

leave a reply