येमेनमधील हौथींविरोधी संघर्षासाठी इस्रायल युएईला लष्करी सहाय्य पुरविण्यास तयार

लष्करी सहाय्यजेरूसलेम/अबू धाबी – ‘येमेनमधील हौथी दहशतवाद्यांनी युएईची राजधानी अबू धाबीवर चढविलेल्या हल्ल्यांचा इस्रायल कठोर शब्दात धिक्कार करतो. या क्षेत्रातील शांती आणि स्थैर्य अबाधित राखण्यासाठी अशा दहशतवादी संघटनांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. युएईने या दहशतवादी हल्ल्यांविरोधात पुकारलेल्या संघर्षाला इस्रायलचा पूर्ण पाठिंबा असेल. यासाठी युएईला आवश्यक ते लष्करी सहाय्य पुरविले जाईल’, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी केली.

चार दिवसांपूर्वी येमेनमधील हौथी बंडखोरांनी युएईच्या राजधानीवर ड्रोन्स तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे जवळपास ३० हल्ले चढविले होते. अबू धाबी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इंधनप्रकल्पांना लक्ष्य करून चढविलेल्या हल्ल्यांमध्ये दोन भारतीयांसह तिघांचा बळी गेला. हौथी बंडखोरांनी येत्या काळात युएईवर अधिक भीषण हल्ले चढविण्याची धमकी दिली.

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून युएईला लष्करी आणि गोपनीय माहितीसंबंधी आवश्यक ते सहाय्य पुरविण्याचे आश्‍वासन दिले होते. यानंतर पंतप्रधान बेनेट यांच्या कार्यालयाने याबाबत निवेदन जारी केले.

‘युएईला हवे ते लष्करी सहाय्य पुरविण्याचे आदेश इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत. या क्षेत्रात दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या संघर्षात युएईला सहाय्य करण्यासाठी इस्रायल वचनबद्ध आहे. दोन्ही देशांच्या समान शत्रूचा पराभव करण्यासाठी इस्रायल युएईबरोबर सहकार्य करण्यास तयार आहे’, असे इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते.

याला दोन दिवही उलटत नाही तोच, गुरुवारी पंतप्रधान बेनेट यांनी युएईचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेतही इस्रायलच्या पंतप्रधानांनी आखाती क्षेत्रातील शांती आणि स्थैर्याला महत्त्व दिले. तसेच या क्षेत्रातील दहशतवाद्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असून युएईने सुरू केलेल्या संघर्षात लष्करी व गोपनीय माहिती पुरविण्यासाठी इस्रायल तयार असल्याचे सांगितले. क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झाएद यांनी देखील इस्रायलच्या या प्रस्तावासाठी आभार व्यक्त केले. युएईच्या दैनिकाने ही माहिती प्रसिद्ध केली.

इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी ग्रीसचे संरक्षणमंत्री निकोलाओस पॅनाइओतोपोलस यांच्याबरोबरच्या बैठकीतही युएईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. ‘व्हिएन्ना येथील चर्चेद्वारे पाश्‍चिमात्य देशांबरोबर अणुकरार करण्याच्या तयारीत असलेला इराण आखातातील आपल्या दहशतवादी संघटनांमार्फत अस्थैर्य माजवित आहे. युएईवरील हल्ला याचे उदाहरण ठरते’, असा आरोप गांत्झ यांनी केला.

इस्रायलने युएईला दिलेल्या या प्रस्तावावर इराणने भुवया उंचावल्या आहेत. येमेनमधील हौथींवरील कारवाईसाठी युएईला लष्करी सहाय्य पुरविण्याच्या प्रस्तावामागे इस्रायलचा वेगळा हेतू असल्याचा आरोप इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला. युएईने इस्रायलचा सुरक्षा सहकार्याचा प्रस्ताव स्वीकारला तर ती पाकिस्तानसाठी चिंतेची बाब ठरेल, असे पाकिस्तानच्या पत्रकारांचे म्हणणे आहे.

युएईबरोबरील इस्रायलचे सहकार्य हा इराणच्या चिंतेचा विषय असल्याचे बोलले जाते. युएई व इस्रायलमध्ये २०२० साली अब्राहम करार झाला होता. यानुसार युएईने पाहिल्यांदाच इस्रायलबरोबर राजनैतिक सहकार्य प्रस्थापित केले. त्यानंतर इराणने युएईला गंभीर परिणामांच्या धमक्या दिल्या होत्या. इस्लामी देशांमधील कट्टरपंथियांनीही युएईला टीकेचे लक्ष्य केले होेते. पण युएईने आपल्या जनतेच्या प्रगतीसाठी अब्राहम करार आवश्यक असल्याचे सांगून त्याचे समर्थन केले होते.

leave a reply