राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या धोरणांमुळे इस्रायल-सौदी सहकार्य अवघड बनले

- अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रॉन डिसँटीस

इस्रायल-सौदी सहकार्यतेल अविव – ‘राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिका व सौदी अरेबियामधील संबंध तोडण्यासाठी अधिक मेहनत घेतली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल व सौदीमध्ये सहकार्य प्रस्थापित करणे अवघड बनले आहे’, अशी जळजळीत टीका रॉन डिसँटीस यांनी केली. पण अमेरिकेने आपल्या भूमिकेत बदल केला तर इस्रायल-सौदीमधील सहकार्य नक्की शक्य होईल, असा दावाही डिसँटीस यांनी केला.

पुढच्या वर्षी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रॉन डिसँटीस यांनी नुकताच इस्रायलचा दौरा केला. अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध व सहकार्य कधीही मोडता येणार नसल्याची ग्वाही डिसँटीस यांनी केली. तसेच जेरूसलेम आणि वेस्ट बँकच्या मुद्यावर इस्रायलच्या सार्वभौमत्त्वाला आपले समर्थन असल्याचे डिसँटीस यांनी सांगितले. पण गेल्या दोन वर्षात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची सौदीबाबतची भूमिका इस्रायलसाठी घातक ठरल्याची टीका डिसँटीस यांनी केली.

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकल कुरिला यांनी देखील दोन दिवसांपूर्वी इस्रायलचा दौरा केला. यावेळी सेंटकॉमच्या प्रमुखांनी इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांची भेट घेऊन या क्षेत्रातील इराणच्या वाढत्या आक्रमकतेवर चर्चा केली. सिरिया, लेबेनॉन, इराक, येमेन आणि इतर भागातील इराणचा प्रभाव आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक सहकार्य आवश्यक असल्याचे जनरल कुरिला म्हणाले.

leave a reply