सौदीशी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरू

- इस्रायली उद्योजकांचे शिष्टमंडळ सौदीत दाखल

सहकार्य प्रस्थापितजेरूसलेम – ‘इतर अरब देशांप्रमाणे सौदी अरेबियाबरोबर देखील सहकार्य प्रस्थापित होऊ शकते व ते इस्रायलच्या हिताचे असेल. यासाठी इस्रायल प्रयत्न करीत आहे’, अशी घोषणा इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी केली. इस्रायल, सौदी आणि इजिप्त यांच्यात सनाफिर व तिरान या बेटांच्या हस्तांतरणाप्रकरणी डील होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचबरोबर इस्रायली उद्योजकांचे मोठे शिष्टमंडळ सौदी अरेबियाच्या विशेष दौऱ्यावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

गेल्या दहा दिवसांमध्ये आखातातील घडामोडींनी वेग धरला आहे. आठवड्यापूर्वी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ आणि सौदीचे उपसंरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान एकाचवेळी अमेरिकेत होते. इस्रायल व सौदीच्या या दोन्ही नेत्यांनी काही तासांच्या अंतराने पेंटॅगॉनला भेट दिली. तर वॉशिंग्टनमधील एकाच हॉटेलमध्ये इस्रायल व सौदीच्या नेत्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असे अमेरिकन माध्यमांचे म्हणणे होते. यानंतर अमेरिका इस्रायल व सौदीमध्ये मध्यस्थी करीतअसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

सहकार्य प्रस्थापितइजिप्तमधील सिनाई प्रांताच्या दक्षिणेकडे आणि रेड सीच्या मुखाशी सनाफिर आणि तिरान या दोन बेटांच्या हस्तांतरणावरुन इस्रायल, इजिप्त व सौदीमध्ये चर्चा होऊ शकते, अशी बातमी अमेरिकन वृत्तसंस्थेने दिली होती. इजिप्तचे सरकार सनाफिर आणि तिरान बेटे सौदीला परत देत आहे. ही बेटे इस्रायलच्या एलियट या बंदरशहराच्या सागरीमार्गात येतात. त्यामुळे इस्रायलला हाताशी घेऊन अमेरिका सौदी व इजिप्तसह वाटाघाटी करीत असल्याचे अमेरिकन वृत्तवाहिन्यांचे म्हणणे होते. यासाठी अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी सौदीत दाखल झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

गेल्या दहा दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या या बातम्यांवर इस्रायलने प्रतिक्रिया दिली नव्हती. इस्रायलच्या आर्मी रेडिओशी बोलताना परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी जाहीररित्या सौदी अरेबियाशी सहकार्य प्रस्थापित होऊ शकते, अशी कबुली दिली होती. तसेच यासाठी इस्रायल अमेरिका आणि इतर अरब देशांच्या सहाय्याने प्रयत्न करीत असल्याचेही इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यांनी स्पष्ट केले. इस्रायल आणि सौदीत सहकार्य प्रस्थापित होण्यासाठी बराच काळ लागू शकतो, असा दावा लॅपिड यांनी केला.

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री सौदीबरोबरच्या संभाव्य सहकार्याबाबत बोलत असताना, इस्रायली उद्योजकांचे शिष्टमंडळ सौदीमध्ये दाखल झाले आहे. या शिष्टमंडळासाठी सौदीने विशेष व्हिसा पुरविल्याचा दावा केला जातो. इस्रायलमध्ये सौदीची गुंतवणूक आणण्यासाठी हे शिष्टमंडळ प्रयत्न करणार असल्याचे इस्रायली वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्याचबरोबर इस्रायल आणि सौदीच्या नेत्यांमध्ये छुप्या चर्चा झाल्याच्या बातम्याही नेमक्या समोर येत आहेत. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ तसेच गुप्तचर यंत्रणा मोसादचे माजी प्रमुख योसी कोहेन आणि तामिर पार्दो यांनी सौदीला भेट दिल्याची बातमी इस्रायली वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली.

दरम्यान, इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी सौदीही तयार असल्याचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी म्हटले होते. तसेच इस्रायल हा सौदीचा शत्रूदेश नसल्याचे सांगून क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी इराणला इशारा दिला होता.

leave a reply