इस्रायलने इराणवरील हल्ल्यासाठी तयार रहावे

- मोसादच्या माजी प्रमुखांचा इशारा

तेल अविव – ‘इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला चढविण्याची इस्रायलकडे लष्करी क्षमता आहे व हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचणाऱ्या इराणवर हल्ला चढविण्यासाठी इस्रायलने तयार रहावे. लवकरच इस्रायलला याबाबत गंभीर निर्णय घ्यावा लागेल’, असा इशारा इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख झोहार पाल्टी यांनी दिला. हिजबुल्लाह, हमास, इस्लामिक जिहाद, हौथींच्या सहाय्याने आखातात इंटिग्रेटेड मिसाईल सिस्टीम उभारत असल्याचे संकेत इराणने काही तासांपूर्वी दिले होते. त्यानंतर मोसादच्या माजी प्रमुखांनी दिलेला हा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

मोसादइराण धोकादायक वेगाने युरेनियमचे संवर्धन करीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांनी केला होता. इराणने आपल्या अणुकार्यक्रमात केलेली ही प्रगती चिंताजनक असल्याचे पाल्टी यांनी म्हटले आहे. ‘येत्या काही दिवसात किंवा आठवड्यांमध्ये इराण 90 टक्के इतक्या प्रमाणातील संवर्धित युरेनियम प्राप्त करण्यात यशस्वी होईल. असे झाले तरी इराण लगेच अणुबॉम्बची निर्मिती करील, असा त्याचा अर्थ होत नाही. पण इराण इतक्या वेगाने या टप्प्यावर पोहोचेल, असे कधीही वाटले नव्हते’, असे पाल्टी यांनी एका कार्यक्रमात बजावले.

मोसादअणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचत असलेला इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी, इराणच्या अणुप्रकल्पांवरील लष्करी कारवाईसाठी इस्रायलने तयार रहावे, असा इशारा मोसादच्या माजी प्रमुखांनी दिला. त्याचबरोबर इस्रायलच्या अंतर्गत राजकीय घडामोडींवरही पाल्टी यांनी भाष्य केले. अमेरिका इस्रायलचा जूना सहकारी देश असून इस्रायलने अमेरिकेच्या सहमतीशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असा सल्ला पाल्टी यांनी इस्रायलमध्ये सत्तेवर येणाऱ्या बेंजामिन नेत्यान्याहू यांना दिला. त्याचबरोबर इस्रायलने जॉर्डनबरोबरच्या सहकार्यातून माघार घेऊ नये, असेही मोसादच्या माजी प्रमुखांनी सुचविले आहे.

दरम्यान, इस्रायलचे भावी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सौदी अरेबियाला अब्राहम करारात सामील करुन घेण्याचा इरादा व्यक्त केला आहे. इराणविरोधी युद्धाची शक्यता बळावत चाललेली असताना सौदीशी सहकार्य वाढविण्याचे संकेत नेत्यान्याहू यांनी आखाती वृत्तवाहिनीशी बोलताना दिले होते. तर सौदीने देखील या सहकाकार्याच्या मोबदल्यात जेरूसलेममधील प्रार्थनास्थळाचे अधिकार आपल्याकडे सोपविण्याची मागणी केली होती. इस्रायलने ही मागणी मान्य केली तर जॉर्डबरोबरच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता. अशा परिस्थितीत मोसादच्या माजी प्रमुखांनी नेत्यान्याहू सरकारला इशारा दिल्याचे दिसत आहे.

इस्रायलने बॉम्बहल्ल्याचा मोठा कट उधळला

मोसादजेरूसलेम – इस्रायलच्या प्रमुख शहरांमध्ये इस्रायली नागरिक व जवानांवर बॉम्बहल्ले घडविण्याचा मोठा कट उधळल्याचा दावा इस्रायली संरक्षणदलाने केला. याप्रकरणी इस्रायलने वेस्ट बँकमधील 16 जणांना ताब्यात घेतले आहे. गाझापट्टीतून मिळणाऱ्या इशाऱ्यांवर वेस्ट बँकमधील दहशतवाद समर्थक काम करीत होते, अशी माहिती इस्रायली संरक्षणदलाने दिली.

दहशतवादी आणि कट्टरपंथियांचा वेस्ट बँकमधील प्रभाव वाढत चालला आहे. गाझापट्टीतील दहशतवादी संघटनांच्या आदेशावरुन वेस्ट बँकमधील कट्टरपंथियांनी इस्रायलच्या प्रमुख शहरांमध्ये स्फोट तर स्थानिकांवर हल्ले घडविण्याची तयारी केली होती. याची माहिती मिळताच इस्रायलच्या दहशतवादविरोधी पथकाने वेस्ट बँकमधील अलमानिया आणि अद-धाहिरीया या भागात केलेल्या कारवाईत 16 जणांना अटक केली. यामध्ये काही वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश आहे.

गाझातील हमास ही दहशतवादी संघटना वेस्ट बँकमधील या दहशतवादासाठी जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा ‘शिन बेत’ने केला.

leave a reply