कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी भारताने केलेल्या सहकार्याबद्दल इस्रायलने आभार मानले 

जेरूसलेम – इस्रायलमध्ये कोरोनाव्हायरसचे शंभराहून अधिक बळी गेले असून या देशातील रुग्णांची संख्या दहा हजारांच्या पलीकडे गेली आहे. अशा परिस्थितीत  या भयंकर साथीचा सामना करीत असलेल्या इस्रायलने भारताने केलेल्या सहाय्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.  या साथीच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा सुमारे पाच टन इतका पुरवठा भारताने इस्रायलला केला आहे.  त्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी भारताचे आभार मानले आहेत.

इस्रायलमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीत १०३ जण दगावले आहेत तर या देशात कोरोनाचे १०८७८  रूग्ण आढळले आहेत. या साथीच्या रूग्णांवरील या उपचारासाठी इस्रायलने भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मागणी केली होती.   इस्रायललचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी यासंदर्भात फोनवरून चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा सुमारे पाच टन इतका पुरवठा इस्रायलला केला.

त्यावर इस्रायलच्या पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले आहेत.  ‘इस्रायलचा मित्र भारत व या देशाचे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद! हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध इस्रायलला पाठविल्याबद्दल आभार!’ असा संदेश इस्रायलच्या पंतप्रधानांनी सोशल मिडीयावर टाकला आहे.

आखाती देशांमध्येही कोरोनाव्हायरसची साथ पसरत असल्याचे दिसत आहे. आखाती  देशांमध्ये  या साथीने ८८ जण दगावले असून आखाती देशात कोरोनाव्हायरसचे १३२०० रूग्ण सापडले आहेत. या आखाती देशांमधल्या कुवैतला भारताने वैद्यकीय मदत पाठवली आहे. शुक्रवारी १५ डॉक्टरांचे पथक कुवैतमध्ये दाखल झाले आहेत.

leave a reply