इस्रायल सिरियातील इराणच्या तळांवर नवे हल्ले चढविल – आखाती माध्यमांचा दावा

दमास्कस – इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्डस् कॉर्प्स’चे (आयआरजीसी) वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल इस्माईल घनी यांनी नुकतीच सिरियाला भेट दिली होती. इराण व इराण संलग्न संघटना इस्रायलचा विनाश करतील असा दावा मेजर जनरल इस्माईल घनी यांनी केला. यामुळे, सिरियातील इराणच्या लष्करी तळांवरील इस्रायलच्या हल्ल्यांची शक्यता बळावली आहे. चार दिवसांपूर्वी सिरियात झालेले हवाई हल्ले हेच दाखवून देत असल्याचा दावा आखातातील आघाडीच्या वृत्तसंस्थांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात मेजर जनरल घनी यांनी सिरियाला अघोषित भेट दिली होती. सिरियाच्या पूर्वेकडील देर अल-झोर प्रांतातील इराणच्या लष्करी तळांना भेट देऊन मेजर जनरल घनी यांनी या तळांवरील इराणच्या जवानांची चौकशी केली होती. यावेळी घनी यांनी इस्रायलचे भाकित वर्तविले होते. इस्रायलचा शेवट जवळ असून लवकरच त्याचा विनाश होईल, असा दावा घनी यांनी केला होता. इराणच्या आघाडीच्या वृत्तसंस्थांनी घनी यांचा सिरिया दौरा आणि त्यांनी दिलेल्या धमकीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. पुढच्या काही तासात इस्रायलने सिरियातील इराणच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले चढवले होते. देर अल-झोर प्रांतातील अल-बुकमल तळावर चढवलेल्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला होता. यामध्ये इराणच्या जवानांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नव्हती. पण या हल्ल्यामागे इस्रायलच असल्याचा दावा सिरियन माध्यमांनी केला होता. मेजर जनरल घनी यांच्या सिरिया दौऱ्यानंतर आणि त्यांनी इस्रायलच्या विनाशाबाबत वर्तविलेल्या धमकीनंतर सिरियातील इराणच्या लष्करी तळांवरील इस्रायलच्या नव्या हल्ल्याची शक्यता बळावली आहे. याआधी ‘आयआरजीसी’चे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल कासिम सुलेमानी यांच्या सिरिया दौऱ्यानंतरही इस्रायलने सिरियातील इराणच्या तळांवर भीषण हल्ले चढवले होते. या पार्श्वभूमीवर घनी यांच्या या सीरिया दौऱ्यानंतर इस्रायलकडून इराणच्या तळांवरील हल्ले वाढू शकतात असा दावा आखाती माध्यमे करीत आहेत. सिरियातील इराणचा तळांवर झालेल्या हल्ल्यांबाबत तसेच यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या बातमीबाबत इस्रायली लष्कराने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पण घनी यांचे दावे आपण गांभीर्याने घेतल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी इराणची राजधानी तेहरान जवळच्या पारचीन येथील लष्करी तळाजवळ शक्तिशाली स्फोट झाला होता. लष्करी तळाजवळ उभ्या असलेल्या गॅस टँकमध्ये हा स्फोट झाल्याचा दावा इराणच्या माध्यमांनी केला होता. तर हा स्फोट म्हणजे, इराणने केलेली अणुचाचणी होती, असे धक्कादायक दावे काही पाश्चिमात्य वृत्तवाहिन्या व विश्लेषकांनी केले होते. याला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही. येथील लष्करी तळावर इराणने अणुचाचणी घेतल्याच्या बातम्या अमेरिका व युरोपमधील काही माध्यमे देत आहेत. यासाठी या वृत्तवाहिन्यांनी युरोपियन कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्सचा दाखला देऊन हा स्फोट म्हणजे इराणची अणुचाचणीच होती, असे म्हटले आहे.

जर इराणने खरोखरच अणुचाचणी केली असेल, तर ती संपूर्ण आखाती क्षेत्रासह साऱ्या जगात भीषण परिणाम घडवून आणणारी बाब ठरेल. कुठल्याही परिस्थितीत आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक असलेल्या इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नाही, हे इस्रायलने याआधीच बजावले होते. यासाठी इस्रायल कुठल्याही थराला जाईल व कितीही मोठी किंमत चुकती करताना कचरणार नाही, असे या देशाच्या नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते. इराणला प्रतिस्पर्धी मानणाऱ्या सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या आखाती देशांनीही इराणने अणुबॉम्ब मिळविला तर आपणही त्याच मार्गाने पुढे जाऊ असे आंतरराष्ट्रीय समुदायाला धमकावले होते. यापार्श्वभूमीवर इराणमध्ये झालेल्या त्या स्फोटाबाबतचे गुढ अधिकच वाढत चालले आहे.

leave a reply