इराणवर हल्ला चढविण्यासाठी इस्रायल अझरबैजानचा तळ वापरणार

- इस्रायली वर्तमानपत्राचा दावा

तेल अविव – आर्मेनियाविरोधी संघर्षासाठी इस्रायल अझरबैजानला मोठ्या प्रमाणात प्रगत शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. अझरबैजानबरोबरच्या लष्करी सहकार्याअंतर्गत इस्रायल हे सहाय्य करीत आहे. या मोबदल्यात अझरबैजानने इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादला इराणविरोधी कारवाईसाठी आपल्या देशातील हवाईतळ पुरविल्याचा खळबळजनक दावा इस्रायलमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने केला. अणुबॉम्बच्या निर्मितीजवळ पोहोचलेल्या इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ल्याबाबत इस्रायलकडून इशारे प्रसिद्ध होत आहेत. अशावेळी इराणविरोधी कारवाईसाठी अझरबैजानने इस्रायलला हवाईतळ पुरविल्याबाबत समोर आलेली माहिती लक्षवेधी ठरत आहे.

इराणवर हल्ला चढविण्यासाठी इस्रायल अझरबैजानचा तळ वापरणार - इस्रायली वर्तमानपत्राचा दावा२०१६, २०२० आणि २०२१ या तीन वर्षी आर्मेनिया आणि अझरबैजान या माजी सोव्हिएत देशांमध्ये संघर्ष भडकला होता. नोगोर्नो-काराबाख या स्वायत्त प्रांताच्या ताब्यासाठी दोन्ही मध्य आशियाई देशांमध्ये मोठा संघर्ष पेटला होता. या संघर्षात इस्लामधर्मिय अझरबैजानला इस्रायलने लष्करी स्तरावर सहाय्य केले होते. ‘हारेत्झ’ या इस्रायली वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, २०१६ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत अझरबैजानच्या ‘सिल्क वे एअरलाईन्स’च्या ९२ मालवाहू विमानांनी इस्रायलच्या ओवडा हवाईतळावरुन उड्डाण केले होते.

अझरबैजानचे आर्मेनियाबरोबर संघर्ष सुरू असतानाच्या काळातच या मालवाहू विमानांचा वापर झाल्याचे इस्रायली वर्तमानपत्राने म्हटले आहे. त्यामुळे इस्रायलने अझरबैजानला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य पुरविल्याची शक्यताही या वर्तमानपत्राने वर्तविली. युरोपमधील ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस इनिशिएटीव्ह’ने दिलेल्या माहितीनुसार, २०१६ सालापासून इस्रायलने अझरबैजानला मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे पुरविल्याचे म्हटले होते. त्यामुळे आर्मेनियाबरोबरच्या संघर्षाच्या काळातच इस्रायलने अझरबैजानला शस्त्रसहाय्य केल्याचे इस्रायली वर्तमानपत्र सांगत आहे.

इराणवर हल्ला चढविण्यासाठी इस्रायल अझरबैजानचा तळ वापरणार - इस्रायली वर्तमानपत्राचा दावाइस्रायलने अझरबैजानला दिलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती उघड झाली नव्हती. पण इस्रायलने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, हवाई सुरक्षा यंत्रणा आणि कामिकाझे ड्रोन्स पुरविल्याचा दावा केला जातो. अझरबैजान हा इस्रायलचा सर्वात मोठा इंधन पुरवठादार देश आहे. तर अझरबैजान देखील इस्रायलकडून व्यापक स्तरावर लष्करी सहाय्य घेत आहे. मात्र आर्मेनियाबरोबरच्या युद्धात दिलेल्या लष्करी सहाय्याच्या मोबदल्यात अझरबैजानने इस्रायलला हवाईतळ तसेच मोसादसाठी इराणच्या सीमेजवळ तळ उभारून दिल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

अझरबैजानने इस्रायलला कोणते हवाईतळ पुरविले, हे स्पष्ट झालेले नाही. पण अझरबैजानने याआधीही इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादला इराणविरोधी कारवाईसाठी सहाय्य केले होते, असा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला. २०१८ साली मोसादने इराणमध्ये घुसून अणुकार्यक्रमाबाबतचे गोपनीय दस्तावेज हस्तगत केले होते. यानंतर मोसादच्या एजंट्सनी अझरबैजानच्या मार्गानेच इराणमधून पळ काढला होता, असे या वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. इस्रायल सरकार किंवा सुरक्षा यंत्रणांनी या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इस्रायलला अझरबैजानचे मिळणारे लष्करी सहाय्य इराणसाठी इशारा असल्याचे दिसत आहे.

हिंदी English

 

leave a reply