सिरियन राजधानीजवळ इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले

दमास्कस – इस्रायलच्या लष्कराने राजधानी दमास्कसजवळ क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन वृत्तसंस्थेने केला. गेल्या दहा दिवसात इस्रायलने राजधानी दमास्कसवर केलेला हा दुसरा हल्ला असल्याचे सिरियन वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने इस्रायलला सिरियात हल्ले न करण्याची सूचना केली होती. त्यानंतरही इस्रायलने हे हल्ले चढविल्याचे सिरियन वृत्तसंस्था लक्षात आणून देत आहे.

बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दमास्कसच्या दक्षिणेकडील भागात क्षेपणास्त्रे कोसळली. इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांच्या भागातून हे हल्ले झाले. इस्रायलने जमिनीवरुन जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा दावा सिरियन वृत्तसंस्थेने केला.

गेल्या आठवड्यात इस्रायलने दमास्कसजवळच हवाई हल्ले चढविले होते. सिरियातून इस्रायलच्या हद्दीत क्षेपणास्त्र हल्ले झाल्यानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी ही कारवाई केली होती. सिरियातून प्रक्षेपित झालेली क्षेपणास्त्रे वेळीच नष्ट केल्याचे इस्रायलने म्हटले होते. तर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आपला एक जवान ठार झाल्याची टीका सिरियन लष्कराने केली होती.

या हल्ल्यांची दखल घेऊन रशियाने इस्रायलला सिरियावरील हल्ले थांबविण्याचे आवाहन केले होते. पण यानंतरही इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ले चढवून रशियाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे सिरियन माध्यमांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वीच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली रशियाची लढाऊ विमाने सिरियात दाखल झाली आहेत.

leave a reply