इस्रायलच्या मोसादचे एजंट्स बहारीनमध्ये ‘ऍक्टिव्ह‘

- बहारीनच्या वरिष्ठ नेत्यांची कबुली

मोसादचे एजंट्सम्युनिक – इस्रायल आणि बहारीनमध्ये सुरक्षाविषयक सहकार्य असून या अंतर्गत गोपनीय माहितीचे आदान-प्रदान सुरू आहे. त्यानुसार इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे एजंट्स बहारीनमध्ये आणि या क्षेत्रात कार्यरत आहेत, अशी जाहीर कबुली बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपमंत्री ‘शेख अब्दुल्ला बिन अहमद अल खलिफा’ यांनी दिली. म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स येथे बोलताना बहारीनच्या मंत्र्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांत्ज हे देखील उपस्थित होते.

‘या क्षेत्रामध्ये स्थैर्य आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी इस्रायल आणि बहारीनमधील हे सहकार्य आवश्यकच आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी हे सहकार्य आवश्यक ठरतेे’, शेख अब्दुल्ला बिन अहमद अल खलिफा यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्याचबरोबर मोसादच्या प्रमुखांनी आपल्या देशाला भेट दिल्याचे स्थानिक माध्यमांच्या दाव्यांना शेख अब्दुल्ला दुजोरा दिला. बहारीन आणि इस्रायलमध्ये प्रस्थापित झालेल्या अब्राहम कराराअंतर्गत हे सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणामधील सहकार्य सुरू असल्याची माहिती शेख अब्दुल्ला यांनी दिली. तसेच यापुढेही हे सहकार्य असेच सुरू राहणार असल्याचे शेख अब्दुल्ला म्हणाले.

मोसादचे एजंट्सशेख अब्दुल्ला यांच्यासोबत या सुरक्षा बैठकीत सहभागी झालेले इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांत्ज यांनी काही दिवसांपूर्वीच बहारीनचा दौरा केला होता. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी देखील बहारीनला भेट देऊन राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली होती. याशिवाय इस्रायलने काही दिवसांपूर्वीच बहारीनमध्ये आपला नौदल अधिकारी तैनात केला होता. इराणच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायल अरब देशांबरोबर सहकार्य वाढवीत असल्याचा दावा आखाती माध्यमे व विश्‍लेषक करीत आहेत.

दरम्यान, इस्रायली गुप्तचर यंत्रणा अरब-आखाती देशांमध्ये कार्यरत असल्याच्या बातम्या याआधीही आल्या होत्या. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आयोजित बैठकींमध्ये सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांच्या नेत्यांनी इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्याच्या बातम्या व फोटोग्राफ प्रसिद्ध झाले होते. मोसाद आणि अरब देशांच्या यंत्रणांमध्ये छुपे सहकार्य असल्याचे दावेही पाश्चिमात्य माध्यमांनी केले होते. सुरक्षाविषयक बैठकीत अरब नेत्याने इस्रायली नेत्याच्या उपस्थितीत ही घोषणा करणे लक्षवेधी घटना ठरते.

leave a reply