हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलची गाझावर हवाई कारवाई

तेल अविव – इस्रायलमधील बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या सरकारने पॅलेस्टिनी कैद्यांबाबत केलेल्या घोषणेवर गाझापट्टीतील हमासने रॉकेट हल्ले चढवून प्रतिक्रिया दिली. त्याबरोबर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी देखील गाझातील हमासचा रॉकेटची निर्मिती करणारा कारखाना नष्ट केला. या कारखान्यात रसायने असल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. यानंतर गाझातून इस्रायलवर प्रतिहल्ला झालेला नाही. पण इस्रायल आणि पॅलेस्टिनींमधील वाढता संघर्ष विध्वंसक टप्प्यात प्रवेश करीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

israel gaza strikeगेल्या आठवड्यात जेरूसलेममधील ज्यूधर्मियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वेस्ट बँक तसेच गाझापट्टीतील पॅलेस्टिनींनी स्वागत केले होते. काही ठिकाणी पॅलेस्टिनींनी मिठाई वाटली व फटाके फोडले होते. रामल्लाह येथील इस्रायलच्या तुरुंगात कैद असलेल्या पॅलेस्टिनींनी देखील प्रार्थनास्थळावरील हल्ल्यावर आनंद साजरा केला होता. यानंतर इस्रायलचे अंतर्गत सुरक्षामंत्री बेन-ग्वीर यांनी सदर कैद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले व सुरक्षा यंत्रणांनी या पॅलेस्टिनी कैद्यांना अंधारकोठडीत डांबले.

पॅलेस्टाईनच्या हितासाठी इस्रायलच्या कैदेत असलेले आरोपी पॅलेस्टाईनमध्ये हिरो मानले जातात. त्यांना पॅलेस्टिनींकडून आदराची वागणूक दिली जाते. पॅलेस्टाईनमधील राजकीय पक्ष तसेच हमास व इस्लामिक जिहाद सारख्या दहशतवादी संघटना देखील या कैद्यांचे भांडवल करून पॅलेस्टिनींचे समर्थन मिळवितात. त्यामुळे इस्रायली यंत्रणांनी या कैद्यांना अंधारकोठडीत डांबल्यानंतर हमासने याविरोधात निषेध केला. त्याचबरोबर बुधवारी रात्री हमासच्या ‘अल कासम ब्रिगेड’ या गटाने इस्रायलच्या दक्षिणेकडील शहरांच्या दिशेने रॉकेट हल्ले चढविले.

गाझाच्या सीमेजवळ तैनात आयर्न डोमच्या रडारने रॉकेटचा माग काढून ते नष्ट केले. यातील एक रॉकेट इस्रायलच्या हद्दीत कोसळले. यावेळी बंकरमध्ये आश्रय घेण्यासाठी धाव घेणारी 50 वर्षांची महिला पाय घसरल्यामुळे पडली व जखमी झाली. यानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझापट्टीवर हल्ले चढविले. मध्य गाझातील हमासच्या ठिकाणाला इस्रायलच्या विमानांनी लक्ष्य केले. या हल्ल्यात हमासचा रॉकेट निर्मितीचा महत्त्वाचा कारखाना नष्ट केल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. अल कासम ब्रिगेडच्या या कारखान्यात रसायने देखील होती, असे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून इस्रायल आणि पॅलेस्टिनींमध्ये संघर्ष सुरू आहे. पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमधील जेनिन शहरात इस्रायली लष्कर व इस्लामिक जिहादच्या समर्थकांमध्ये संघर्ष पेटला होता. त्यानंतर हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले होते. याला काही तास उलटत नाही तोच जेरूसलेममध्ये ज्यूधर्मियांच्या प्रार्थनास्थळावर दहशतवादी हल्ला झाला व पूर्व जेरूसलेममध्ये ज्यूधर्मियांवर गोळीबार झाला. तर गेल्या चोवीस तासात हमास व इस्रायलमधील संघर्ष, याचा दाखला देऊन आंतरराष्ट्रीय विश्लेषक इस्रायल व पॅलेस्टिनींमधील संघर्ष विनाशकारी टप्प्यात प्रवेश करीत असल्याचे बजावले आहे.

leave a reply