विमानाच्या गॅसोलिन इंधनाचा आयातदार असलेल्या भारताकडून याची निर्यात सुरू

‘एव्हिएशन गॅसोलिन’ निर्यात करणारी इंडियन ऑईल भारताची पहिली कंपनी ठरली

मुंबई – भारतातील इंधन इतिहासात नवा अध्याय सुरू झाला आहे. विमान इंधनासाठी आतापर्यंत दुसऱ्या देशांवर अवलंबून असणाऱ्या भारताने आयातदार देश म्हणून आपली ओळख पुसण्यास सुरुवात केली आहे. इंडियन ऑईल कॉपरेशनने ॲव्हिएशन गॅस-एव्ही गॅस अर्थात विमानात इंधन म्हणून वापरात येणारा वायू विकसित केला असून या ‘एव्ही गॅस’ची निर्यातही सुरू केली आहे. नैॠत्य पॅसिफीक क्षेत्रातील पापुआ न्यू गिनी या देशाला 80 बॅरल ‘एव्ही गॅस’ भारताने निर्यात केला. ‘एव्ही गॅस’ची भारतातून झालेली ही पहिलीच निर्यात असून 2.7 अब्ज डॉलर्सच्या या इंधनाच्या जागतिक बाजारपेठेत याद्वारे भारताने प्रवेश केल्याचा दावा, इंडियन ऑईलने केला आहे.

indain-oil-resized‘इंडियन ऑईल कॉपरेशन’ने (आयओसी) स्वदेशी ‘एव्ही गॅस’ विकसित केला असून त्याला ‘एव्ही गॅस 100 एलएल’ असे नाव दिले आहे. हे इंधन मानवरहित विमाने (युएव्ही), तसेच पिस्टन इंजिन असलेल्या प्रशिक्षण विमानांमध्ये वापरले जाते. मोठ्या व्यावसायिक विमानांमध्ये ‘एव्हिएशन टर्बाइन फ्युअल’चा (एटीएफ) वापर होतो. यापेक्षा हे इंधन वेगळे असून जगभरातून या इंधनाची मागणी वाढत आहे.

संरक्षणदलांकडील युएव्हीसाठी हे इंधन महत्त्वाचे आहे. दक्षिण अमेरिका, आशिया-प्रशांत, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोपात या इंधनाची मोठी मागणी आहे. दरवर्षी ही बाजारपेठ 5 टक्के दराने विस्तारीत होत आहे. तसेच देशातील विमान वाहतूकही 7 टक्के दराने वाढत आहे. या बाजारपेठेतील संधीचा लाभ उचलण्याची तयारी सरकारी इंधन कंपनी ‘आयओसी’ने केली आहे. मात्र देशातील मागणी पूर्ण करून ‘एव्ही गॅस 100 एलएल’ची निर्यात करण्यात येईल, असे ‘आयओसी’ने स्पष्ट केले आहे.

‘आयओसी’ने पापुआ न्यू गिनी या देशाला 80 बॅरल ‘एव्ही गॅस’ निर्यात केला. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरातून (जेएनपीटी) हे ‘एव्ही गॅस’ कन्सायंमेंट पापुआ न्यू गिनीसाठी रवाना झाले. ही भारतातून ‘एव्ही गॅस’ची झालेली पहिलीच निर्यात ठरते. याद्वारे भारताने ‘एव्ही गॅस’च्या निर्यात बाजारपेठेत शिरकाव केला आहे.

‘आयओसी’ने विकसित केलेली इंधनाची गुणवत्ता चांगली असून आयात इंधनाच्या तुलनेत हे खूप स्वस्त पडणार आहे. त्यामुळे या प्रकारच्या इंधन आयातीवर खर्च होणारे परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाचेल. तसेच देशातील विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा खर्च कमी होईल. लष्कराच्या युएव्ही संचलनासाठी येणारा खर्चातही मोठी घट या स्वदेशी इंधनामुळे होईल व अधिक प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करणे शक्य होईल, असा दावाही करण्यात येत आहे.

सध्या ‘आयओसी’च्या वडोदरा येथील प्रकल्पात सध्या ‘एव्ही गॅस 100 एलएल’चे उत्पादन घेतले जात आहे. येथे वार्षिक 5 हजार टन ‘एव्ही गॅस 100 एलएल’चे उत्पादन घेण्याची क्षमता आहे. सध्या भारत युरोपातून ‘एव्ही गॅस’ची आयात करीत आहे.

leave a reply