युक्रेन प्रकरणी भारतावर टीका करणाऱ्या युरोपिय देशांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे खणखणीत प्रत्युत्तर

ब्रातिस्लाव्हा – युक्रेनच्या युद्धात भारत कुणाच्याही बाजूने उभे न राहता कुंपणावर बसून राहिल्याची टीका युरोपिय देश करीत आहेत. युरोपिय देशांच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी याला जबरदस्त उत्तर दिले. भारत कुंपणावर नाही, तर आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे जयशंकर यांनीठासून सांगितले. इतकेच नाही तर याआधी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर युरोपने मौन पाळले होते, याची आठवण भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. युरोपची समस्या ही जगाची समस्या ठरते, पण जगाची समस्या ही काही आपली समस्या नाही, अशी युरोपची मानसिकता आहे, अशा परखड शब्दात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपिय देशांच्या आत्मकेंद्री धोरणाला लक्ष्य केले.

युक्रेन प्रकरणी भारतावर टीका करणाऱ्या युरोपिय देशांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे खणखणीत प्रत्युत्तरस्लोव्हाकिया आणि झेक प्रजासत्ताक या देशांच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लाव्हा येथील ग्लोबसेक फोरम या चर्चासत्रात भाग घेतला. युक्रेनच्या युद्धात भारताने स्वीकारलेले तटस्थ धोरण युरोपिय देशांना मान्य नाही. भारताची तटस्थता रशियाला अनुकूल ठरणारी असल्याचे आरोप युरोपिय देश करीत आहेत. युक्रेनच्या युद्धात भारत कुणाचीही बाजू न घेता कुंपणावर बसून असल्याचा आक्षेप अमेरिका व काही युरोपिय देशांनी नोंदविला होता. तसेच आज रशियाच्या हल्ल्यामुळे आज युक्रेनवर जी वेळ ओढावली आहे, तशीच परिस्थिती चीनच्या कारवायांमुळे भारतावरही ओढावू शकते, असे सांगून युरोपिय देश भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सारे आक्षेप व इशाऱ्यांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नेमक्या शब्दात उत्तर दिले.

युक्रेनच्या युद्धात भारत आपल्याला हवी ती भूमिका स्वीकारत नाही, यासाठी युरोपिय देश भारतावर टीका करीत आहेत खरे. पण याआधी कितीतरी वेळा अत्यंत महत्त्वाच्या मुद्यांकडे युरोपिय देशांनी दुर्लक्ष करून मौन धारण केले होते. युरोपची समस्या ही जगाची समस्या ठरते, पण जगाची समस्या मात्र युरोपची समस्या असू शकत नाही, अशी युरोपिय देशांची मानसिकता आहे, असे खडे बोल भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुनावले. आशिया खंडात झालेल्या कित्येक घटनांबाबत युरोपने मौन पाळले होते. यामुळे आशियाई देश युरोपवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. असे का होत आहे, यावर युरोपने एकत्र येऊन विचार करायला हवा, अशी चपराक जयशंकर यांनी लगावली.

युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा, चीनच्या भारतविरोधी कारवायांशी संबंध जोडण्याच्या युरोपिय देशांच्या प्रयत्नांचीही जयशंकर यांनी खिल्ली उडविली. ‘एका ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षात मी कुणा एकाची बाजू घेतली, तर दुसऱ्या ठिकाणी पेटलेल्या संघर्षात कुणी माझी बाजू घेणार नाही, हा तर्क पटणारा नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारभार अशारितीने चालत नाही’, अशा कानपिचक्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिल्या. तसेच युक्रेनचे युद्ध पेटण्याआधीच चीनने भारताच्या विरोधात कारवाया केल्या होत्या, त्याचा युक्रेन किंवा रशियाशी काहीही संबंध नव्हता, असे जयशंकर पुढ म्हणाले.

सध्या भारताचे चीनबरोबरील संबंध ताणलेले असले तरी त्याला सामोरे जाण्याची धमक भारताकडे आहे, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपिय देशांना करून दिली. तसेच युरोपिय देश दावा करीत आहेत, त्याप्रमाणे भारताने युक्रेनमधील संघर्षाकडे दुर्लक्ष केलेले नाही. पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमिर झेलेन्स्की यांच्याशी स्वतंत्रपणे फोनवरून चर्चा केली होती. याला काही दुर्लक्ष म्हणता येणार नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले.

दरम्यान, युक्रेनच्या युद्धाबाबत भारताने स्वीकारलेल्या तटस्थ धोरणाची आंतरराष्ट्रीय निरिक्षकांकडून प्रशंसा होत आहे. भारताला सातत्याने लक्ष्य करणारे चीन व पाकिस्तानसारखे देश देखील भारताच्या या धोरणाची मुक्तकंठाने प्रशंसा करीत आहेत. सौदी अरेबिया, युएईसह काही आखाती देशांनी भारताच्या या तटस्थ धोरणाचा आदर्श समोर ठेवला आहे. या युद्धात रशिया किंवा युक्रेन यापैकी कुणाचीही बाजू न घेता येणार नाही. राजनैति वाटाघाटीतूनच युक्रेनची समस्या सुटेल, असे सौदी अरेबियाने नुकतेच म्हटले होते. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासून भारताने हीच भूमिका स्वीकारली होती.

मात्र अमेरिका आणि युरोपिय देश भारताला रशियाच्या विरोधात उभे करण्याची स्वप्ने पाहत होते. भारताने रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारली असती, तर त्याचे फार मोठे दडपण रशियावर आले असते. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट शब्दात हा दावा करून यासाठी भारताच्या पंतप्रधानांना विनंती केली होती. पण भारताने ही मागणी अमान्य करून आपले तटस्थ धोरण कायम ठेवले होते. अमेरिकेचे इशारे व धमक्या मिळाल्यानंतरही भारताने आपल्या धोरणात बदल केलेला नाही. तरीही अमेरिका व युरोपिय देशांनी या प्रकरणी भारतावरील दडपण वाढविण्याचे प्रयत्न सोडून दिलेले नसल्याचे स्लोव्हाकियाच्या राजधानीतील ग्लोबसेक फोरममध्ये उघड झाले आहे.

leave a reply