छत्तीसगडमध्ये माओवाद्यांबरोबरील चकमकीत जवान शहीद

रायपूर – शनिवारी छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ‘डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड’च्या (डीआरजी) जवानांना वीरमरण आले. या हल्ल्यात पाच माओवादी जखमी झाल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांनी दिली.त्याचवेळी छत्तीसगडच्या दांतेवाडामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून सुरक्षादलांवरील हल्ल्याचा कट उधळला गेला आहे.

जवान शहीद

शनिवारी सकाळी सुरक्षादलाने नारायणपूरच्या जंगलात माओवाद्यांविरोधात शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी जंगलात दडून बसलेल्या माओवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकीत ‘डीआरजी’चे पोलीस ‘संतु वडू’ शहीद झाले. तर दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या चकमकीत पाच माओवाद्यांना गोळी लागली. पण हे जखमी माओवादी पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी सुरक्षादलांनी दांतेवाडाच्या जंगलात माओवाद्यांनी जमिनीखाली दडून ठेवलेला शस्त्रसाठा जप्त केला. या शस्त्रसाठ्यासंदर्भांत स्थनिकांनीच सुरक्षादलांना माहिती पुरविली होती. सुरक्षादलांनी येथून पाच किलाचे दोन टिफिन बॉम्ब्स, तीन पाईप बॉम्ब्स, दोन बॅटरीज, ५० मीटर इलेक्ट्रिक वायर, आयईडी स्फोटके बनविण्यासाठी वापरण्यात येणारे सामान आणि बंदी घातलेले साहित्य जप्त केले.

leave a reply