‘जिओ’ची ‘५जी’ सेवेची घोषणा

मुंबई – रिलायन्स ‘जिओ’ पुढील वर्षी देशात संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावावर आधारित ५जी सेवा सुरु करील, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली आहे. ‘जीओ’ची ही घोषणा म्हणजे अप्रत्यक्षरित्या चीनच्या ‘हुवेई’ला भारताची दारे बंद झाल्याचे मानले जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ‘जिओ’च्या या घोषणेचे स्वागत केले आहे. भारताच्या ‘जिओ’, ऑस्ट्रोलियाच्या ‘टेलस्ट्रा’, दक्षिण कोरियाच्या ‘एसके’ टेलिकॉम, जपानच्या ‘एनटीटी’प्रमाणे इतर कंपन्यांनीही ‘हुवेई’ला रोखण्यासाठी पुढे यावे असे पॉम्पिओ यांनी म्हटले आहे.

JIO-5Gदेशात ‘५जी’ सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ‘५जी’ स्पेक्ट्रमसाठी आवश्यक असलेले परवाने मिळाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाँच करण्यात येईल, अशी माहिती ‘जिओ‘ कंपनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी दिली. कंपनीने संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले असून हे तंत्रज्ञान अन्य कंपन्यांना देण्यास, त्याची निर्यात करण्यास रिलायन्स सक्षम असल्याचेही ते म्हणाले.

देशात ५जी सेवा सुरु करण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत असतानाच सुरक्षा कारणास्तव चीनच्या हुवेई कंपनीला या संपूर्ण प्रक्रियेपासून बाहेर करण्यात आले आहे. यासर्व घडामोडीत जिओकडून ५जी ची घोषणा करण्यात आली. देशात ५जी तंत्रज्ञान सुरु झाल्यास डेटाची गती अनेक पटींनी वाढेल. ५ जी नेटवर्कद्वारे डेटा ४ जीपेक्षा १०० ते २५० पट अधिक वेगाने पाठवता येईल. देशात ५जी सेवा सुरु झाल्यास हा महत्वाचं टप्पा ठरेल.

‘५जी’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रात वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या चीनला एकामागोमाग एक धक्के लागत आहेत. ‘५जी’ तंत्रज्ञानात आघाडी घेणाऱ्या ‘हुवेई’वर चिनी लष्करासाठी हेरगिरीचे आरोप आहेत. चीनच्या ‘हुवेई’ कंपनीवर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड सारख्या आघाडीच्या देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदी टाकली आहे. हेरगिरीचे आरोप असलेल्या ‘हुवेई’वर भारतातही बंदी घालण्यात यावी अशी मागणी होत आहे. यापार्श्वभूमीवर स्वदेशी तंत्रज्ञानावावर आधारित ५जी सेवेची ‘जीओ’ने केलेली घोषणा म्हणजे ‘हुवेई’ला भारतीय बाजारपेठ बंद झाल्याचे मानले जात आहे.

leave a reply