भारत व फ्रान्सच्या विमानवाहू युद्धनौकांचा लवकरच संयुक्त सराव

नवी दिल्ली/पॅरिस – भारत व फ्रान्सच्या विमानवाहू युद्धनौका एप्रिल महिन्यात संयुक्त नौदल सरावात सहभागी होणार आहेत. नौदलाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिल्याचा दावा करण्यात आला असून दोन्ही नौदलांमध्ये तारीख निश्‍चित करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते. भारताची ‘आयएनएस विक्रमादित्य’ व फ्रान्सची ‘न्यूक्लिअर एअरक्राफ्ट कॅरिअर चार्ल्स दि गॉल’ सरावात सहभागी होणार आहे. एप्रिल महिन्यातच फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री भारताचा दौरा करणार असून सात रफायल लढाऊ विमानेही दाखल होणार आहेत.

भारत आणि फ्रान्समधील संरक्षण सहकार्य गेल्या काही वर्षात अतिशय मजबूत होत असल्याचे दिसत आहे. भारत व फ्रान्समध्ये ‘रफायल’ लढाऊ विमानांसाठी झालेला संरक्षण करार, स्कॉर्पिन पाणबुड्यांसाठी फ्रान्सने केलेले सहकार्य, लष्करी विमानांच्या पुरवठ्यासाठी फ्रान्सने दाखविलेली उत्सुकता आणि ‘क्वाड’मध्ये सहभागासाठी फ्रान्सने दाखविलेली तयारी या गोष्टी त्याला दुजोरा देणार्‍या ठरततात. गेल्याच महिन्यात, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युअल बन यांच्यात, अमेरिकेच्या धर्तीवर व्यापक संरक्षण कराराबाबत चर्चा झाल्याचेही समोर आले होते.

ही सर्व पार्श्‍वभूमी लक्षात घेता भारत व फ्रान्सच्या विमानवाहू युद्धनौकांमध्ये होणारा संयुक्त सराव महत्त्वाचा ठरतो. ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात चीनच्या कारवाया वाढत असताना अमेरिकेपाठोपाठ आपल्या युद्धनौका व पाणबुड्या या क्षेत्रात धाडणारा फ्रान्स हा पहिला युरोपिय देश ठरला होता. फ्रान्सने अमेरिकेप्रमाणे स्वतंत्र ‘इंडो-पॅसिफिक पॉलिसी’ही जाहीर केली असून त्यात भारताला मध्यवर्ती स्थान देण्यात आले आहे. गेल्या वर्षी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी, दोन्ही देशांमध्ये नौदल सहकार्य भक्कम करण्यासाठी अधिकाधिक सरावांचा प्रस्तावही दिला होता. एप्रिल महिन्यात होणारा सराव त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे.

फ्रान्सची आण्विक विमानवाहू युद्धनौका ‘चार्ल्स दि गॉल’ दोन विनाशिका व सपोर्ट शिप सह ‘क्लेमेन्स २१’ मोहिमेवर आहे. याच मोहिमेअंतर्गत ती भूमध्य सागरी क्षेत्रातून पुढे अरबी समुद्र व हिंदी महासागरात दाखल होणार आहे. फ्रान्सच्या विमानवाहू युद्धनौकेवर ‘रफायल एम’ ही लढाऊ विमाने तैनात आहेत. भारत व फ्रान्सच्या विमानवाहू युद्धनौकांमध्ये होणारा सरावही दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यात अरबी समुद्र व हिंदी महासागर क्षेत्र यात होणार्‍या वेगवेगळ्या सरावांचा समावेश आहे.
भारताकडून ‘आयएनएस विक्रमादित्य’सह वेस्टर्न फ्लीटचा भाग असणार्‍या युद्धनौका सहभागी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. वेस्टर्न फ्लीटचे नवे कमांडर रिअर अ‍ॅडमिरल अजय कोचर भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहेत. भारताच्या ‘आयएनएस विक्रमादित्य’वर तैनात असलेली ‘मिग-२९के’ लढाऊ विमाने या सरावात सहभागी होतील. दरम्यान, हिंदी महासागर क्षेत्रात आपल्या नौदलाचा वावर वाढवून चीन भारताला याच क्षेत्रात बंदिस्त करण्याच्या कारस्थानावर काम करीत आहे. भारतीय नौदलाने आपल्या प्रभावाचा विस्तार करून नये, यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र भारताचा व्यापार व अर्थव्यवस्थेची क्षमता वाढत असताना, आपल्या नौदलाचा विस्तार करणे भारतासाठी अनिवार्य बनले आहे. सागरी क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदल क्षमता वाढवित आहे. यासाठी जगभरातील प्रमुख देशांबरोबर भारतीय नौदल सातत्याने सराव करीत आहे.
या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सच्या विमानवाहू युद्धनौकेबरोबरील भारताचा नौदल सराव अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. याद्वारे भारत व फ्रान्स इंडो-पॅसिफिक क्षेत्रात वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या चीनला सज्जड इशारा देत असल्याचे दिसत आहे.

leave a reply