पाकिस्तानसाठी कोरोनापेक्षाही टोळधाडीचे संकट अधिक भयंकर

locust attackइस्लामाबाद – पाकिस्तानातील कोरोनाव्हायरसचा फैलाव भयावह पातळीच्या पलीकडे पोहोचला असून या देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख दहा हजारांच्या पुढे गेली आहे. अधिकृत पातळीवर या साथीने आपल्या देशात दोन हजाराहून अधिक बळी घेतल्याचे पाकिस्तान सांगत असला तरी प्रत्यक्षात ही बळींची संख्या कितीतरी पट अधिक असल्याचे आरोप सुरू झाले आहेत. असे असले तरी कोरोनापेक्षाही अधिक भयंकर संकट पाकिस्तान समोर आल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे संकट म्हणजे टोळधाड असून आत्तापर्यंत या टोळधाडीने पाकिस्तानची दोन कोटी ३० लाख हेक्‍टर इतकी शेती फस्त केली आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा हिस्सा वीस टक्के इतका आहे. गहू, डाळी, तेलबिया व आंबे यांचा समावेश असलेल्या सुमारे दोन कोटी ३० लाख हेक्टर शेतजमिनीवरील पीक टोळधाडीने फस्त करून टाकले. पाकिस्तानच्या अन्नसुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या पाकिस्तानी जनतेची अवस्था दयनीय बनली आहे . म्हणूनच पाकिस्तानच्या प्रांतांनी कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्यापेक्षा आपले लक्ष टोळधाडपासून उरलेली पिके वाढविण्याकडे वळविले आहे.

Pakistan Coronaआधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाळात रुतलेली आहे. त्यातच कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे पाकिस्तानातील आर्थिक व्यवहार ठप्प पडले होते. आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही म्हणून कोरोनाव्हायरसची साथ असताना देखील पाकिस्तानच्या सरकारने लॉकडाऊन घोषित न करण्याचा अत्यंत बेजबाबदार निर्णय घेतला होता. हा निर्णय देखील पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाचू शकलेला नाही . पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरूच असून टोळधाडीने पाकिस्तानची अर्थव्यवस्था अधिकच बरबाद करून टाकली आहे. इम्रान खान यांच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे पाकिस्तानला टोळधाडचाही सामना करता येत नसल्याची जळजळीत टीका पत्रकार व विश्लेषक करीत आहेत.

पाकिस्तानात सध्या अन्नधान्याच्या टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून महागाईमुळे पाकिस्तानातील गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीला ही पंतप्रधान इम्रान खान यांची चुकीची धोरणे जबाबदार असल्याचे आरोप केले जात आहेत. त्याचवेळी अर्थव्यवस्था सांभाळण्यातही इम्रान खान यांच्या सरकारला दारुण अपयश आले आहे. या महिन्यात सादर होणार्‍या अर्थसंकल्पात पाकिस्तानच्या सरकारने खर्चात कपात केली नाही तर पाकिस्तानला पुढचे कर्ज दिले जाणार नाही, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बजावले आहे. त्यामुळे पाकिस्तान एकाच वेळी कोरोनाव्हायरसची साथ टोळधाड आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या शर्ती अशा तिहेरी संकटात सापडल्याचे दिसते आहे.

leave a reply