माओवाद्यांना संघर्ष बंदी हवी

भुवनेश्वर, दी. ७ (वृत्तसंस्था ) –  ओडिशातील माओवाद्यांनी सरकारसमोर संघर्षबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे. कोरोनाव्हायरसचा फैलाव देशभरात झाला आहे. यापार्श्वभूमीवर माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या दुर्गम क्षेत्रात औषधाचा पुरवठा प्रशासनाला करता यावा यासाठी आपण ही संघर्ष बंदी करीत असल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे. मात्र काही माओवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून यामुळेच गावकऱ्यांचे  कारण पुढे करून माओवादी या भागात औषध पुरवठ्याची भाषा करीत आहेत, अशी शंका उपस्थित केली जाते. 

माओवाद्यांनी ध्वनिफीत व एका पत्रकाद्वारे सरकारकडे वैद्यकीय पथक पाठ्वण्याची मागणी केली आहे. जंगलात व दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी  वैद्यकीय पथक पाठवावे.  जवानांनी माओवाद्यांनविरोधात कारवाई केली नाही तर माओवादी देखील हल्ले करणार नसल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे. माओवाद्यांचा मलकानगिरी-कोरापुट-विशाखा विभागीय समितीचा (एमकेव्हीडीसी) सचिवांने ही मागणी केली आहे. तसेच आपल्या संघटनेतील कोणालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याचा दावा ऑडिओमध्ये करण्यात आला आहे.

मात्र दोन आठवड्यापूर्वी सुरक्षादलाच्या जवानांवर हल्ला करणाऱ्या माओवाद्यांकडून संघर्ष बंदीची भाषा करण्यात येत असल्याने शंका उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनाव्हायरसचा फैलाव होत असल्याने माओवादी धास्तावले असल्याचे स्पष्ट दिसते. माओवाद्यांना देखील कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. गावकऱ्यांचे कारण पुढे करत माओवादी मदत मागत असल्याचा दावा केला जात आहे.

तसेच हिंसाचार थांबविण्यासाठी माओवाद्यांवर स्थानिक पातळीवरून  दबाव वाढत असावा. यामुळेही हिंसाचार थांबविण्याची भाषा माओवादी बोलत असावेत असे  बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी, टी. म्हणाले.

leave a reply