दहशतवादी हल्ल्यांचे थेट प्रक्षेपण करताना माध्यमांनी सावधानता दाखवावी

माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर

नवी दिल्ली – भूकंप, आग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवादी हल्ल्यांची माहिती देताना माध्यमांनी अधिक जबाबदारी दाखवावी, अशी अपेक्षा केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. दहशतवादी हल्ल्याचे थेट प्रक्षेपण करीत असताना, हल्लेखोरांना आपल्याकडून महत्त्वाची माहिती पुरविली जात नाही, तसेच त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी आपण अजाणतेपणे सहाय्य करीत नाही, याची खात्री माध्यमांनी करून घ्यावी, असा सल्ला ठाकूर यांनी दिला आहे.

anurag thakur‘एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टींग युनियन’च्या (एबीयू) आमसभेत माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर बोलत होते. दहशतवादी हल्ल्यांचे थेट प्रक्षेपण करीत असताना आपल्याकडून महत्त्वाची माहिती दहशतवाद्यांपर्यंत पोहोचणार नाही, याची दक्षता घ्या, असा सल्ला यावेळी ठाकूर यांनी दिला. विशेषतः ज्या वेगाने दहशतवादी हल्ल्याची माहिती जगभरात पसरते, तो वेग तसेच त्याची अचूकता अतिशय महत्त्वाची ठरते. याचे थेट प्रसारण करण्यांना ही जाणीव असलीच पाहिजे. जनतेचा विश्वास कायम ठेवण्याला जबाबदार माध्यमांनी सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे, असे ठाकूर पुढे म्हणाले. कोरोनाची साथ आलेली असताना माध्यमांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचे सांगून ठाकूर यांनी यासाठी माध्यमांची प्रशंसा केली.

कोरोनाच्या साथीबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नात काही पत्रकारांचा बळी गेला होता. प्रसार भारतीनेच या साथीत आपले शंभराहून अधिक सदस्य गमावले, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. तरीही प्रसार भारतीने जनजागृतीचे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले होते, याचा माहिती व प्रसारणमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. एबीयूने पुढच्या काळातही माध्यमात काम करणाऱ्यांना कौशल्य प्रदान करून उत्तम माध्यम व्यावसायिक तयार करावे, असा संदेश यावेळी अनुराग ठाकूर यांनी दिला.

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ला सुरू असताना भारतीय वृत्तवाहिन्यांवरील या हल्ल्याचे प्रक्षेपण पाहून पाकिस्तानातील या हल्ल्याचे सूत्रधार दहशतवाद्यांना सूचना देत होते. कालांतराने ही माहिती जगजाहीर झाली होती. पण इतक्या तीव्रतेच्या दहशतवादी हल्ल्याची बातमी पहिल्यांदाच देत असलेल्या भारतीय वृत्तवाहिन्यांना आपल्याकडून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या माहितीचा गैरवापर होत असल्याची जाणीव झाली नव्हती. पुढच्या काळात माध्यमांनी यासंदर्भात अधिक सावधपणा दाखविल्याचे समोर आले होते.

leave a reply