सौदीचे क्राऊन प्रिन्स व कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

क्राऊन प्रिन्सनिओम – कतारचे परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद यांनी सौदी अरेबियाचा दौरा करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. दोन्ही आखाती शेजारी देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी सौदी-कतार समन्वय परिषद स्थापन केल्याचे यावेळी उभय देशांनी जाहीर केले. साडेतीन वर्षांच्या राजकीय तणावानंतर उभय देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित होत आहे. तर अफगाणिस्तानातील घडामोडी व अफगाणिस्तानबाबत कतार बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर, या भेटीचे महत्त्व वाढले आहे.

कतारचे इराणबरोबरील सहकार्य आणि हिजबुल्लाह व हौथी या दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठिंबा यामुळे गेल्या साडे तीन वर्षांपासून सौदी आणि कतारमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला होता. सौदी व सौदीसंलग्न अरब-आखाती देशांनी कतारवर बहिष्कार टाकला होता. आखाती देशांच्या ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’मधूनही कतारला वगळण्यात आले होते. तसेच सौदी व मित्रदेशांनी कतारमधील आपल्या राजदूतांना मायदेशी बोलावून घेतलेहोते. या तणावाचा परिणाम आखातातील इंधनवाहतूकीपासून ते प्रवासी विमानांच्या उड्डाणापर्यंत झाला होता. कारण सौदी अरेबियाने कतारची कोंडी केली होती.

पण या वर्षाच्या जानेवारी महिन्यात अल-उला येथील ‘जीसीसी’च्या बैठकीत सौदीने कतारला आमंत्रित करून संबंध सुधारण्याचे संकेत दिले. तर या महिन्याच्या सुरुवातीला कतारने सौदीमध्ये राजदूत नियुक्त करून दोन्ही शेजारी देशांमधील सहकार्य पूर्वपदावर येत असल्याचा संदेश दिला होता. अशा परिस्थितीत, कतारचे परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी बुधवारी सौदीच्या निओम शहरात क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरते.

या भेटीनंतर सौदी व कतारमध्ये समन्वय परिषद स्थापन करण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली. उभय देशांमधील संबंध व सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि व्यापक करून विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा करार महत्त्वाचा असल्याचे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. याआधी परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद यांनी कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल-थानी यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासाठी लिहिलेले पत्र हवाली केले. हे पत्र सार्वजनिक करण्यात आलेले नाही.

अफगाणिस्तानात सध्या सुरू असलेल्या गोंधळामध्ये कतार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तालिबानचे राजकीय कार्यालय कतारची राजधानी दोहा येथे आहे. तर अफगाणिस्तानातून माघार घेत असलेले जवान कतारमध्ये उतरविले जात आहेत. अफगाणिस्तानातील हवाई मोहिमांचे नेतृत्वही कतारमधून केले जात होते. यामुळे आत्ताच्या काळात कतारचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर, कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सौदीचे संरक्षणमंत्री असलेल्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट लक्षवेधी ठरते.

leave a reply