अमेरिकेतील दोन हजारांहून अधिक बँका दिवाळखोर बनल्या आहेत

- अमेरिकी अभ्यासगटाचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेतील दोन हजारांहून अधिक बँका दिवाळखोरीत असल्याचा गंभीर इशारा ‘हूवर इन्स्टिट्यूशन’ या अभ्यासगटाने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील ‘जेपी मॉर्गन’ या वित्तसंस्थेने ‘फर्स्ट रिपब्लिक’ ही बँक खरेदी केल्याचे जाहीर केले होते. गेल्या तीन महिन्यात अमेरिकी बँक अपयशी ठरण्याची ही चौथी घटना ठरली. ‘फर्स्ट रिपब्लिक’च्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बँकिंग क्रायसिस अद्याप संपलेले नाही, याकडे लक्ष वेधण्यात येत असून नवा इशाराही त्याचाच भाग ठरतो.

अमेरिकेतील दोन हजारांहून अधिक बँका दिवाळखोर बनल्या आहेत - अमेरिकी अभ्यासगटाचा इशारामार्च महिन्यात अवघ्या काही दिवसांच्या अवधीत अमेरिकेतील तीन बँका एकापाठोपाठ एक करीत कोसळल्या होत्या. त्यात ‘एसव्हीबी’, ‘सिग्नेचर बँक’ व ‘सिल्व्हरगेट’ यांचा समावेश होता. या बँकांच्या अपयशानंतर सुरू झालेल्या पडझडीत ‘फर्स्ट रिपब्लिक बँके’चे नाव समोर आले होते. विम्याचे संरक्षण नसलेल्या ठेवींची मोठी टक्केवारी हे त्यामागील प्रमुख कारण ठरले होते. मार्च महिन्यात कोसळणाऱ्या बँकांपैकी ‘एसव्हीबी’ व ‘सिग्नेचर बँक’ या बँकांना बायडेन प्रशासनाने अर्थसहाय्य देऊन वाचविले होते.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ व बायडेन प्रशासन सातत्याने सर्व काही आलबेल असल्याचे सांगत असून मोठ्या संकटाची शक्यता फेटाळत आहेत. मात्र अमेरिकेतील विविध विश्लेषक, अर्थतज्ज्ञ व अभ्यासगटांकडून ‘बँकिंग क्रायसिस’कडे वारंवार लक्ष वेधण्यात येत असून अमेरिकी जनतेला सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणात अमेरिकेतील ४८ टक्के जनतेचा बँकेतील ठेवींवर विश्वास राहिला नसल्याचे उघड झाले होते. ही बाब अमेरिकी बँकांसाठी धोक्याचे संकेत असल्याचे विश्लेषकांनी म्हंटले आहे.

अमेरिकेतील दोन हजारांहून अधिक बँका दिवाळखोर बनल्या आहेत - अमेरिकी अभ्यासगटाचा इशारा‘हूवर इन्स्टिट्यूशन’मधील अभ्यासक अमित सेरू व सहकाऱ्यांचा नवा अहवालही बँकिंग क्षेत्रातील संकटाची जाणीव करून देणारा ठरतो. अमेरिकेतील एकूण ४,८०० बँकांपैकी २,३१५ बँका जवळपास दिवाळखोरीत असल्याचे ‘हूवर इन्स्टिट्यूशन’च्या अहवालात बजावण्यात आले आहे. या बँकांकडे असलेली देणी त्यांच्याकडील मालमत्तेपेक्षा जास्त आहेत व हा आकडा जवळपास दोन ट्रिलियन डॉलर्सच्या घरात असल्याकडेे अमित सेरू यांनी लक्ष वेधले.

‘यात केवळ छोट्या अथवा मध्यम बँकाच नाही तर मोठ्या व बहुराष्ट्रीय व्याप्ती असणाऱ्या बँकांचाही समावेश आहे. दहा सर्वात धोकादायक बँकांपैकी एक आंतरराष्ट्रीय बँक असून त्याची मालमत्ता एक ट्रिलियन डॉलर्सहून अधिक आहे. अमेरिकेतील दोन हजारांहून अधिक बँका दिवाळखोर बनल्या आहेत - अमेरिकी अभ्यासगटाचा इशारातर इतर तीन बँका अमेरिकेतील मोठ्या बँकांमध्ये गणल्या जातात’, अशी माहिती अमित सेरू यांनी दिली. समस्या फक्त ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ किंवा ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ यांच्यापुरती मर्यादित नाही तर अमेरिकी बँकिंग क्षेत्राचा बराचसा हिस्सा दिवाळखोरीतच आहे, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

‘हूवर इन्स्टिट्यूशन’चा अहवाल प्रसिद्ध होत असतानाच अमेरिकेतील ‘पॅसिफिक वेस्टर्न’ व ‘वेस्टर्न अलायन्स’ या दोन बँकांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. या बँकांनाही अपुरा निधी व भांडवलाच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात दोन्ही बँका अडचणीत येऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. अमेरिकेतील ‘बँकिंग क्रायसिस’ गंभीर रुप धारण करीत असतानाच गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढविल्याची माहिती ‘जेपी मॉर्गन’ या आघाडीच्या वित्तसंस्थेने दिली आहे. सोन्यात गुंतवणूक वाढविणाऱ्यांमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) समावेश असल्याचे यात सांगण्यात आले.

हिंदी English

 

leave a reply