सिरिया, लेबेनॉनमधून ‘मोसाद’च्या एजंट्सना अटक

- ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेचा दावा

mossad syriaदमास्कस/बैरूत – गेल्या दोन आठवड्यांमध्ये सिरियातील विमानतळांवर झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे सिरिया तसेच हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना अस्वस्थ बनली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हिजबुल्लाहच्या आदेशांखाली सिरिया आणि लेबेनॉनमधून इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या २५ हून अधिक एजंट्सना अटक झाली आहे. यामध्ये सिरियन लष्कर आणि हवाईदलातील अधिकाऱ्यांचा तसेच एका डॉक्टरचा समावेश असल्याचा दावा ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने केला.

सिरियाची राजधानी दमास्कस आणि अलेप्पो येथील हवाईतळांवर मोठे हवाई हल्ले झाले. यापैकी अलेप्पो येथील हवाईतळावर सलग दोनवेळा हल्ले झाले. तर सिरियाच्या पश्चिमेकडील तार्तूस येथील तळाला देखील रॉकेट्सनी लक्ष्य करण्यात आले होते. या सर्व हल्ल्यांसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप सिरियाने केला होता. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दमास्कस येथील आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानतळाला लक्ष्य केल्याचा ठपका सिरियाने ठेवला होता. तर अलेप्पो येथील हल्ल्यांमध्ये विमानतळाची धावपट्टी तसेच येथील शस्त्रास्त्रांचे कोठाराचे नुकसान झाल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स समोर आले होते.

या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाली नसल्याचे सिरियाने म्हटले होते. पण अलेप्पो येथील हल्ल्यात तिघांचा बळी गेल्याची माहिती ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने प्रसिद्ध केली होती. तसेच इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा या संघटनेने केला होता. तर तार्तूस बंदरात झालेल्या हल्ल्यात इराणसंलग्न गटाचे शस्त्रास्त्राचे मोठे कोठार नष्ट झाल्याचे या संघटनेने सांगितले होते. यानंतर संतापलेल्या सिरियातील अस्साद राजवटीने हवाई हल्ले चढविणाऱ्या इस्रायलला याची जबर किंमत चुकवावी लागेल, असे बजावले होते.

syria airportपण लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायलविरोधी कारवाईची जबाबदारी हाती घेतल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहच्या आदेशांखाली सिरियातील ‘मोसाद’च्या एजंट्सची धरपकड केली जात आहे. याअंतर्गत सिरियन लष्कर व हवाईदलातील अधिकारी व जवानांनाही ताब्यात घेतल्याचा दावा सदर मानवाधिकार संघटनेने केला. किमान ३० हून अधिक जणांना सिरियन यंत्रणांना अकट केल्याची शक्यता वर्तविली जाते. यातही १५ नागरिकांचा समावेश आहे. तर काही जणांची सुटका करण्यात आली असली तरी अजूनही २७ जण सिरियन यंत्रणा व हिजबुल्लाहच्या ताब्यात आहेत.

तर लेबेनॉनची राजधानी बैरूतच्या विमानतळावरुनही सिरियन डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. हा डॉक्टर सिरियातील जलवाहिनी आणि मलनि:स्सारण वाहिनीची माहिती आणि नकाशे मिळवित होता, अशी माहिती हिजबुल्लाह संलग्न ‘अल-अखबार’ या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली आहे. सदर डॉक्टरचे वडिल आणि दोन भाऊ देखील इस्रायली गुप्तचर यंत्रणेसाठी काम करीत असल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला.

दरम्यान, याआधी इराणमधील अणुप्रकल्प आणि लष्करी तळांवर झालेल्या संशयास्पद स्फोटांसाठी ‘मोसाद’ जबाबदार असल्याचा आरोप इराणने केला होता. त्यानंतर इराणमध्ये टाकलेल्या धाडीतून ‘मोसाद’च्या एजंट्सना अटक केल्याचे इराणी माध्यमांनी जाहीर केले होते. यानंतर मोसादने इराणच्या लष्कर तसेच गुप्तचर यंत्रणेत शिरकाव केल्याचा खळबळजनक दावा इराणच्या वरिष्ठ नेत्याने केला होता.

leave a reply