आफ्रिकेत इस्रायलींवर हल्ला चढविण्याचा इराणचा कट मोसादने उधळला

- इस्रायली वृत्तवाहिनीचा दावा

इराणचा कटतेल अविव – आफ्रिकी देशांमध्ये पर्यटन किंवा व्यापारासाठी गेलेल्या इस्रायली तसेच ज्यूधर्मियांना लक्ष्य करण्याचा इराणचा मोठा कट उधळला गेला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून प्रशिक्षण मिळालेल्या पाच दहशतवाद्यांना झालेल्या अटकेनंतर सदर माहिती समोर आली. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याची बातमी इस्रायली वृत्तवाहिनीने दिली.

आफ्रिकेतील सेनेगल, टांझानिया आणि घाना या देशांना परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. यामध्ये इस्रायली आणि ज्यूधर्मियांचा समावेश असतो. यापैकी टांझानियातील जंगल सफारीमध्ये इस्रायली पर्यटक मोठी गर्दी करतात. त्यांच्यावर हल्ले चढविण्याची तयारी पाच संशयितांनी केली होती. पण त्याआधीच हल्लेखोरांना ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पाचही हल्लेखोरांना लेबेनॉनमध्ये प्रशिक्षण मिळाले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कुद्स फोर्सेसने दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी तयार केले होते, अशी माहिती इस्रायली वृत्तवाहिनीने दिली. सेनेगल, टांझानिया आणि घानातील सुरक्षा यंत्रणांनी ही कारवाई केली. तसेच इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने यासाठी माहिती पुरविल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला.

इराणचा कटही कारवाई कधी झाली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याचबरोबर तीनही आफ्रिकी देश किंवा मोसादने देखील या बातमीला दुजोरा दिलेला नाही. इस्रायली वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेली माहिती इराणच्या अधिकार्‍यांनी फेटाळली. हे आरोप निराधार असल्याचे इराणी अधिकार्‍याने म्हटल्याची माहितीही या वृत्तवाहिनीने दिली.

सप्टेंबर महिन्यातच सायप्रसमध्ये स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी अझरबैजानच्या एकाला ताब्यात घेतले होते. सायप्रस या भूमध्य समुद्रातील बेटदेशातील इस्रायली व्यापारांवर हल्ले चढविण्याची तयारी या हल्लेखोराने केली होती. त्याच्या चौकशीत हा इराणच्या योजनेचा भाग असल्याचे उघड झाले, असा दावा केला जातो.

तर या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात इथिओपियातील युएईच्या राजनैतिक अधिकार्‍यावर हल्ला चढविण्यासाठी इराणने दहशतवाद्यांना तयार केले होते. इस्रायलसोबत राजनैतिक सहकार्य प्रस्थापित करणार्‍या युएईला धडा शिकविण्यासाठी इराणने हा कट आखल्याची बातमी अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने दिली होती. वर्षभरापूर्वी इराणची राजधानी तेहरानमध्ये वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या झाली होती. यामागे इस्रायल असल्याचा आरोप करून त्याचा सूड घेण्यासाठी इराणने जगभरातील इस्रायलच्या हितसंबंधावर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. त्यानंतर इस्रायल आणि इराणमधील छुपे युद्ध पेटले होते.

आफ्रिकी देशांमध्ये झालेल्या कारवाईनंतर हे छुपे युद्ध येत्या काळात अधिकच भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणवर कटाचे आरोप करणार्‍या इस्रायली वृत्तवाहिनीने देखील तशी चिंता व्यक्त केली असून नजिकच्या काळात इराण व इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये सुरू असलेला संघर्ष अधिकच तीव्र होईल, असे बजावले आहे.

leave a reply