मोस्ट वॉन्टेड माओवाद्याला छत्तीसगडमध्ये अटक

रायपूर – छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांनी लाखो रुपयांचे इनाम घोषित केलेल्या मोस्ट वॉन्टेड माओवाद्याला अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळाले आहे. छत्तीसगडच्या रांजणगावमध्ये झालेल्या चकमकीत हा माओवादी कमांडर जखमी झाला होता.

Maoist-Chhattisgadमंगळवारी मध्यरात्री छत्तीसगडच्या रांजणगावमधल्या घनदाट जंगलात २० ते २२ माओवादी सुरक्षादलांवर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसले होते. येथील रस्त्यावरुन ‘इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस’ (आयटीबीपी) आणि स्थानिक पोलीसांच्या संयुक्त गस्ती पथकाची वाहने येताच माओवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. याला जवानांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिले. सुरक्षादल आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. अर्धा तास चाललेल्या या चकमकीनंतर माओवादी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. मात्र एक इनामी माओवादी या चकमकीत जखमी झाला. या भागात शोध मोहिमेदरम्यान या माओवाद्याला जखमी अवस्थेत पकडण्यात आले.

या माओवादी कमांडरचे नाव डेव्हिड उर्फ उमेश साकीन असे आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील ‘पिपल्स लिब्ररेशन आर्मी’चा तो प्लाटून कमांडर आहे. त्याच्या शीरावर या तिन्ही राज्यातून २९ लाख रुपयांचे इनाम आहे. या तिन्ही राज्यांमध्ये दहशतवादी हल्ले आणि दलममध्ये नव्या माओवाद्यांच्या भरतीत साकीन सामील होता. सुरक्षादलांनी त्याच्याकडून ‘एके ४७ रायफल’, ‘काट्रीज’, पिस्तूल’,’ वॉकी टॉकी सेट’ आणि वैद्यकीय साम्रगी जप्त केली आहे. त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर येईल, असा दावा सुरक्षादलांच्या अधिकाऱ्याने केला आहे.

दरम्यान, बुधवारी छत्तीसगडच्या दांतेवाड्यात १८ माओवाद्यांनी आत्मसमपर्ण केले. यात एका महिला माओवाद्याचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ‘रिर्टन टु होम’ या अभियानाअंतर्गत हे माओवादी शरण आले. त्यांना आता स्थानिक रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच ओडिशामध्ये कंधमाल जिल्ह्यात माओवाद्यांचा एक तळ उद्वस्थ करण्यात आला आहे.

leave a reply