अमेरिकेच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून जर्मनी-रशियाच्या ‘नॉर्ड स्ट्रीम2’ पूर्ण करण्यासाठी हालचाली

‘नॉर्ड स्ट्रीम2’बर्लिन/मॉस्को – अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जर्मनी व रशियाने पळवाट शोधून काढली आहे. अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देण्यासाठी जर्मनी स्वतंत्र फंडिंग उभारल्याचा दावा जर्मन वर्तमानपत्राने केला. त्याचबरोबर सदर गॅस पाईपलाईनसाठी आवश्‍यक असलेले साहित्य घेऊन निघालेले जहाज बाल्टिक समुद्रात दाखल झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. अमेरिकेतील आगामी सत्ताबदलाच्या पार्श्‍वभूमीवर, जर्मनी व रशियाकडून या हालचाली वाढल्याचा दावा केला जातो.

युक्रेनबरोबर दशकानुदशके सुरू असणारे वाद आणि 2014 साली झालेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने युरोपिय देशांना करण्यात येणाऱ्या इंधनपुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली होती. त्यात ‘नॉर्ड स्ट्रीम’ हा महत्त्वाचा भाग असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यरत झाला आहे. याची क्षमता 55 अब्ज घनमीटर इंधनवायू पुरविण्याची असून ‘नॉर्ड स्ट्रीम 2’च्या माध्यमातून ही क्षमता 110 अब्ज घनमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे. यासाठी रशिया व जर्मनीत करारही झाला असून दोन्ही देशांनी प्रकल्प पुढे नेण्याची तयारी सुरू केली आहे.

‘नॉर्ड स्ट्रीम2’

पण रशियाच्या सैबेरियातून जर्मनी व त्यापुढे युरोपिय देशांपर्यंत जाणाऱ्या या 1230 किलोमीटर लांबीच्या या गॅसपाईपलाईनला अमेरिकेने कडाडून विरोध केला होता. या गॅस पाईपलाईनमुळे युरोपिय देश रशियावर पूर्णपणे अवलंबून राहतील आणि यामुळे युरोपमधील आपल्या हितसंबंधांना धोका निर्माण होईल, अशी चिंता अमेरिकेला सतावित होती. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ प्रकल्पावर निर्बंध लादून जर्मनीने सदर प्रकल्प बंद करावा, यासाठी दबाव टाकला होता.

अमेरिकेच्या या निर्बंधानंतर जर्मनीने सदर प्रकल्प अर्धवट सोडून दिला होता. पण अमेरिकेत सत्ताबदलाची शक्यता बळावली असून पुढच्या महिन्यात ज्यो बायडेन यांचे प्रशासन अमेरिकेच्या सत्तेवर असणार आहे. बायडेन सत्तेवर आल्यास सदर प्रकल्पाला असलेला अमेरिकेचा विरोध मावळेल, असा समज जर्मनीने केला आहे. यामुळे निर्धास्त झालेल्या जर्मनीने अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देण्यासाठी पळवाट शोधून काढल्याचा दावा जर्मन वर्तमानपत्रानेच केला आहे.

जर्मनीच्या ‘मेकनबर्ग-वोर्पोमर्न’ प्रांताच्या पंतप्रधान मॅन्यूएला श्‍वेझीग यांनी ‘हवामान सुरक्षा निधी’ अशी स्वतंत्र फंडिंग यंत्रणा उभारून अमेरिकेच्या निर्बंधांना बायपास करण्याची तयारी केल्याचे सदर वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. या फंडिंगमधून येणारा निधी ‘नॉर्ड स्ट्रिम 2’साठी वळविण्याची श्‍वेझीग यांची योजना असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. तर रशियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रशियाची गाझप्रोम आणि युरोपिय सहकाऱ्यांनी एकत्र येऊन या गॅस पाईपलाईनसाठी आवश्‍यक असलेला 100 टक्के निधी गोळा केल्याचा दावा केला आहे.

त्याचबरोबर रशियाने अर्धवट राहिलेली गॅस पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी सागरी क्षेत्रात हालचाली सुरू केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

leave a reply